ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - भाविकांनी मोठया श्रद्धेने 'लालबागच्या राजा'च्या चरणी अर्पण केलेल्या विविध वस्तूंचा आजपासून लिलाव सुरु होणार आहे. काही भक्तगणांनी यंदा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन स्कूटर आणि दोन बाईक्सही राजाच्या चरणी अर्पण केल्या आहेत.
लालबाग राजाची मुर्ती ज्या स्टेजवर असते तिथे आजपासून पुढचे तीन दिवस १९,२० आणि २१ सप्टेंबरपर्यंत लिलाव चालणार आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती असून यंदा मोटरबाईकसह १ किलोपेक्षा जास्त वजनाची सोन्याची पावलही राजाला अर्पण करण्यात आली आहेत.
या पावलांसाठी ३५ लाखांच्या पुढे बोली लागेल असा कयास आहे. दरवर्षी सोन्याची चैन, अंगठया, सोन्याची बिस्कीटस राजाच्या चरणी अर्पण केली जातात. यंदा ५.५० कोटी पेक्षा जास्त दान जमा झाले आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर लिलाव सुरु होईल अशी माहिती आहे.