ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. २४ - अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अधिक कडक कराव्यात, ओ. बी. सी. आरक्षणास धक्का लागू न देता मराठा समाजास तसेच मुस्लिम समाजास आरक्षण द्यावे, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, ओ.बी. सीं. ची जातवार जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या व इतर प्रमुख मागण्यांसाठी आज अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी वाडिया पार्क स्टेडियममधून मोर्चास सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर चाँदनी चौकात सभा होणार आहे. त्यात निवडक वक्ते मोर्चेकऱ्यांसमोर बोलणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात विविध प्रकारच्या एकूण एकवीस मागण्यांचा समावेश असल्याचे बहुजन क्रानती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.मोर्चासाठी चाँदणी चौकात मंच उभारण्यात आला आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या रस्त्या रस्त्यांवर निळे, पिवळे, हिरवे झेंडे लावलेल्या वाहनांमधून मोर्चेकरी सकाळपासूनच जथ्थ्याने येण्यास सुरुवात झाली आहे. विविध संस्था, मंडळे व संघटनांकडून पिण्याच्या पाण्याच्या पाऊचचे ठिकठिकाणी वाटप करण्यात येत आहे. काही ठिकाणी नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे. पांढऱ्या शुभ्र साड्या परिधान केलेल्या महिला हाती निळे झेंडे घेऊन एकच गर्व, बहुजन सर्व, एकच साहेब....बाबासाहेब’ अशा घोषणात देत मोर्चास्थळाकडे रवाना होत आहेत. शिर्डी-मनमाड रस्त्याने शहरात येणाऱ्या एस. टी. बसेस विळद घाटातील बाह्य वळण रस्त्यावरच थांबविण्यात आल्या आहेत. इतरही मार्गावरील बसेसही बाह्यवळण रस्त्यानेच शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. नगर शहर घोषणांनी दुमदुमले आहे.
VIDEO : अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 12:12 PM