अरुण आडिवरेकर
रत्नागिरी, दि.१८ - कोकणवासियांचा लाडका उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवाची चाहुल लागली की दोन-तीन महिने आधी गणेशमूर्तींच्या कामांना प्रारंभ होतो. मात्र रत्नागिरीत आजही एका दिवसात गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा जपली जाते. विशेष म्हणजे या मूर्तीचे रंगकामदेखील एका दिवसातच होते. एका दिवसात घडणा-या या गणपतीची ख्याती ‘लाल गणपती’ म्हणून परिचित आहे आणि नवसाला पावणारा, अशी त्याची मुख्य ओळख आहे.
पेशवेकालीन असलेला हा गणपती तेली आळीतील शेट्ये कुटुंबियांचा असून सध्या गणपतीचा उत्सव वगैरे सर्व धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे चालत आलेले कार्य हे केदार उर्फ परी शेट्ये व त्यांचा पुतण्या अनिकेत शेट्ये करतात. हा गणपती खासगी असला तरी तो आता सार्वजनिक वाटेल इतर त्याच्यासमोर येणाºया भाविकांची संख्या मोठी आहे.
हा गणपती बनविण्याचा मान पूर्वीपासून रामआळीतील पाटणकर कुटुंबियांकडे आहे. हा गणपती नागपंचमीच्या दिवशी एका दिवसात तयार केला जातो. नागपंचमीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता शेट्ये कुटुंबिय चौरंग व पाट डोक्यावरुन घेऊन पाटणकरांच्या घरी (पुढील दुकानात) गणपतीच्या स्थानावर घेऊन येतात. तेथे पाटणकर कुटुंबिय रितीरिवाजाप्रमाणे पाटाची पूजाअर्चा करुन गणपती तयार करण्यास सुरुवात करतात. एका दिवसात रात्री १२ वाजायच्या आत ही गणपती मूर्ती पूर्ण झाली पाहिजे, असा रिवाज आहे. साधारणपणे रात्री ९ ते ९.३० वाजेपर्यंत ही मूर्ती पूर्ण होते. ही संपूर्ण मूर्ती पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या एकाच कुटुंबाकडून तीही संपूर्ण हाती (साचा नाही) पूर्ण करण्याची परंपरा आहे. या मूर्तीत अगदी जुने फोटो जरी आपण पाहिले आणि सध्याची मूर्ती जरी पाहिली तरी कोणताही फरक जाणवत नाही हे खास वैशिष्ट्य आहे.
सध्या ही मूर्ती संजय (शिवा) दत्तात्रय पाटणकर हे बनवितात. त्यांच्या आधी त्यांचे वडील दत्तात्रय विठोबा पाटणकर गेले अनेक वर्षे ही मूर्ती बनवत होते. वयोमानानुसार शारीरिक थकव्यामुळे आता ते आपल्या मुलाला मार्गदर्शन करतात. त्यांच्याअगोदर त्यांचे वडील विठोबा बाबीशेठ पाटणकर हे ही मूर्ती अनेक वर्षे बनवत असत. त्याही आधी दत्तात्रय पाटणकर यांचे आजोबा बाबी शेट राघोबा पाटणकर व त्याआधी पणजोबा हे ही मूर्ती तयार करीत असत. जुन्या माहितीप्रमाणे शिवा पाटणकर यांची ही लाल गणपतीची मूर्ती बनविण्याची ५ वी पिढी आहे. ही मूर्ती रंगविण्याचा दिवस ठरलेला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती रंगविण्यास सुरुवात होते. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मूर्ती पूर्ण रंगवून झाल्यावर तिला दागदागिने घालून पूजाअर्चा करुन दर्शनाकरिता तयार ठेवली जाते.
दुसºया दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला सकाळी रितीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा पार पडल्यावर सकाळी ८.३० वाजता शेट्ये कुुटुंबिय यांच्या ताब्यात ही मूर्ती दिली जाते. रथातून सवाद्य वाजत गाजत मिरवणुकीने शेट्ये कुटुंबियांच्या घरी स्थानापन्न केली जाते.
थिबा राजाने दिलेला मेणा
पूर्वी इंग्रजांनी नजरकैदेत ठेवलेला ब्रह्मदेशाचा राजा ‘थिबा राजा’ आपल्या रत्नागिरीमध्ये अनेक वर्ष होता. हे आपणाला माहीतच आहे. हा थिबा राजा अत्यंत धार्मिक व दानशूर होता. त्या काळात त्याने आपल्या रत्नागिरीमधील व आजूबाजुच्या अनेक मंदिरांमध्ये जशा भेटवस्तू भक्तीभावाने दिल्या. तसेच या गणपतीवरसुद्धा त्यांची खूप श्रद्धा होती. खास गणपतीला घरी आणण्यापासून ते अगदी विसर्जनापर्यंत नेण्यासाठी एक खास मेणा या शेट्ये कुटुंबांना दिला. त्याकाळी अनेक वर्षे हा गणपती थिबा राजाने दिलेल्या मेण्यातून जात असे.