मुरलीधर चव्हाण, ऑनलाइन लोकमत
मोताळा, दि. १२ - बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटात असलेल्या संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक अस्वल आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील डोंगरशेवली परिसरात यापूर्वी दोन ठिकाणी अस्वलाने हल्ला केल्यामुळे एका वृध्दाचा मृत्यू तर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या.
याबाबत डोंगरशेवली ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन देवून वनमंत्र्यांच्या आदेशान्वये सदर हिस्त्र अस्वलास ठार मारण्याची तयारी केली होती.
मात्र वनविभागाच्या अधिकाºयांना सदर अस्वल अद्यापही आढळून आले नाही. दरम्यान सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारात बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटातील संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात एक अस्वल प्रवाशांना आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर मंदिर परिसराला ज्ञानगंगा अभयारण्य असल्यामुळे ते अस्वल राजूर घाटात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मोताळा वन परिक्षेत्र अधिकारी कोंडावार तसेच कर्मचारी व बुलडाणा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली. राजूर घाटात आढळलेले सदर अस्वल डोंगरशेवली शिवारातील नसल्याची माहिती मोताळा वन परिक्षेत्र अधिकारी कोंडावार यांनी दिली.