सुनील काकडे
वाशिम, दि. 18 - ऐतिहासिक, पौराणिक तथा प्राचीन वारसा लाभलेल्या तलावांचे शहर म्हणून वाशिम शहराची ओळख आहे. सद्या या तलावांमध्ये स्वच्छ पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला असून वाशिमच्या सौंदर्यात यामुळे कमालीची भर पडली आहे. एका अख्यायिकेनुसार, ज्या तलावाच्या पाण्यात स्नान केल्याने दारिद्रयाचे हरण होते, ते ठिकाण म्हणजे आजचा दारिद्रयहरण तलाव होय.
हा तलाव वाशिम शहरातील दक्षिणेकडे वसलेला आहे. ज्या तलावातील पाण्यामध्ये मानवी हाडे विरघळत असल्याची बाब वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली, तो पद्मतीर्थ तलाव वाशिमच्या पश्चिमेला असून शहर तथा दुरवरच्या भाविकांना अक्षरश: भुरळ घालायला लावणारा देवतलाव वाशिमच्या मध्यभागी वसलेला आहे. या तीन तलावांमुळे वाशिमचे वैभव अधिकच खुलते. गत काही वर्षांत या तीनही तलावांचा संबंधित संस्थानिक, प्रशासन तथा काहीअंशी लोकसहभागातून गाळ उपसा, संरक्षण भिंत उभारणे, वृक्षलागवड, आदी कामे झाली आहेत.
सद्या या तीनही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छ जलसाठा झाल्याने ऐतिहासिक ह्यवत्सगुल्मह्ण अर्थात वाशिमच्या सौंदर्यात कमालीची भर पडल्याचे दिसून येत आहे.