ऑनलाइन लोकमतबीड, दि. : रात्र पाळीवर असलेले कर्मचारी झोपल्याचे पाहून शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मंगळवारी पहाटे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करत एल्गार पुकारला. दरम्यान, मी संबंधित कर्मचाऱ्याला केवळ कर्तव्यकाळात झोपू नकोस एवढेच सांगितले. मारहाण केली नसल्याचा खुलासाही शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी पत्रकार परिषद घेवून केला आहे.वर्षभरापूर्वी जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून शंकर मैंड नवाच्या एका कर्मचाऱ्याने विष प्राशन केले होते. या घटनेनंतर आता रात्र पाळीवर सात नंबर वॉर्डमध्ये ड्यूटी करत असलेला कर्मचारी तुकाराम सुर्यभान जगताप, भाऊसाहेब विक्रम बागलाने या दोघांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मारहान केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला आहे. कर्मचारी झोपले असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करायची, कर्मचाऱ्यांना लाथा बुक्यांनी मारहान करण्याचा डॉ. बोल्डे यांना कोणी अधिकार दिला, असे म्हणत जिल्हा रूग्णालयातील परिचारिका व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी यांनी रूग्णालयांसमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
यावेळी आरोग्य उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्रपाळीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना माझ्या कॅबीन मध्ये या असे म्हणून अपमानीत करतात असा आरोप यावेळी रूग्णालय महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष शिला मुंडे, राज्य संघटक सहसचिव राजेंद्र औसरमल, जिल्हा अध्यक्षा आ. सी. दिंडकर, जिल्हा सचिव मंदाकीनी खैरमोडे, ज्योती उबाळे, जयश्री डोरले यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी अंदोलनात सहभाग नोंदवला. कारवाई करण्याचे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान रूग्णांची हेळसांड झाल्याचे चित्र रूग्णालयात पहावयास मिळाले.आंदोलनाच्या दरम्यानच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी पहाटे मी जेव्हा जिल्हा रग्णालयात राऊंडला आलो तेव्हा सात नंबर वॉर्ड मधील कर्मचारी झोपले असल्याचे पाहिले. झोपलेल्या कर्मचाऱ्यांना उठवून मी झोपू नका एवढेच बोललो आहे. मी कोणालाही हानमार केली नाही. झोपलेले आढळलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्साठी मी त्यांना माझ्या कॅबीनला येऊन भेटा असे सांगितले. कारण यापुढे ड्यूटी सुरू असताना झोपू नये याबाबत मला त्यांना सूचना द्यायच्या होत्या, असे डॉ. बोल्डे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.