ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि.३ - लोणावळा परिसरात शुक्रवार पासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भूशी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून धरण ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.
शनिवार-रविवार सुट्टी असल्याने पावसाळयात लोणावळयामध्ये पर्यटक मोठया संख्येने गर्दी करतात. त्यात भूशी धरणात पावसाचा आणि पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईतून मोठया प्रमाणावर पर्यटक येतात. आज पाऊस आणि पाणी तुडुंब असल्याने इथे येणा-या पर्यटकांना मनसोक्त आनंद लुटता येईल.
मागील ४८ तासात लोणावळ्यात ३७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी २४ तासात शहरात १६३ मिमी तर शनिवारी २१४ मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार कोसळणार्या पावसामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरात सर्वत्र पाणी साचले असून नाले सफाई योग्य प्रकारे न झाल्याने ना्गरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली, वलवण बापदेव रोड, बाजार परिसरातील काही गल्ल्या आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
नदी नाले ओसडून वाहू लागले असून पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भूशी धरण ओव्हर फ्लो झाल्याने आज येथे पर्यटकांचा महापूर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.