ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 - कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 मध्ये राधानगरीत ऐतिहासिक धरण उभारले. त्यामुळे येथील परीसर सुजलाम,सुफलाम् करणाऱ्या महाराजांच्या आठवणी, त्यांचा इतिहास आजही स्वाभिमानाने मिरवला जातो. या धरण परिसराला भेटी देताना त्यांच्या कार्यामुळे अनेक जण प्रभावित होतात. मात्र त्याच धरण परिसरात त्यांच्या नावाची पाटी, स्मारक किंवा पुतळा नाही? त्यामुळे त्यांचे स्मारक याठिकाणी व्हावे, अशी मागणी होत असताना तत्कालीन प्रशासन आणि राज्यकर्त्यांना तांत्रिक मर्यादा होत्या. मात्र आता याठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य अशा स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली. बुधवारी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
जे लोक इतिहासाचे स्मरण ठेवतात तेच लोक पुन्हा इतिहास घडवितात. याच जाणिवेतून लोकभावनेचा आदर करत शेवटी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती अभिजीत प्रभाकर तायशेटे यांनी त्यांच्या स्मारकासाठी जि.प च्या विशेष निधीतून तब्बल 40 लाखांची आर्थिक तरतूद केली आणि वर्षभरातच धरणावर हे स्मारक उभारण्याचा संकल्प केला.
याच धरणाच्या पायथ्याशी महाराजांचा जीवनपट सांगणारे माहिती केंद्र, महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य अशा स्मारकाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. भोगावती येथून राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा भव्य मिरवणुकीने ढोल, ताशा, झांज पथकाच्या निनादात, अभूतपूर्व उत्साह आणि गावोगावी मनस्वी पूजा, पुष्पवृष्टी आणि हजारो शाहू प्रेमीच्या साक्षीने आणाजे पर्यंत तेथून पुढे खिंडी व्हरवड़े, गुडाळ, करंजफेण, राधानगरी मार्गावरून ही ऐतिहासिक मिरवणूक थेट धरणावरील स्मारकस्थळी पोचली. अनेक पिढ्यांचे हे स्वप्न साकारताना,अगदी घरादारापर्यंत विकासाची, हरितक्रांतीची 'गंगा' पोहचविणाऱ्या या महापुरुषाला उपस्थितांनी अभिवादन केले.
https://www.dailymotion.com/video/x844nve