- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 05 - आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणा-या बीबी का मकब-याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकब-याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणा-या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकब-याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.
मकब-याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे.
शहेनशहा औरंगजेबचा मुलगा आजमशहाने आई रबिया-उल-दुर्राणी ऊर्फ दिलरसबानो बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. समाधीची मुख्य इमारत १९ फूट उंच आणि ७२ फूट लांबीच्या चौरसाकृती विशाल ओट्यावर उभी आहे. मकब-याच्या अनन्यसाधारण सौंदर्यात भर घालण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. मकब-याच्या निर्मितीसाठी लाल आणि काळे दगड, संगमरवर आणि स्टको प्लॅस्टर (गिलावा) वापरण्यात आले आहे. भिंतीवरील स्टको प्लॅस्टरवरील नक्षीकाम मकब-याचे प्रमुख आकर्षण आहे.
मात्र, आता या गिलाव्याचे पापुदे्र वातावरणाचा मारा आणि भारतीय सर्वेक्षण खात्याच्या उदासीनतेने गळून पडत आहेत. संगमरवराचा शुभ्र परिणाम साधण्यासाठी वापरलेला गिलावा निघाल्यामुळे आतील दगड दिसत आहेत. पावसाचा मारा आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भिंती काळ्या पडत आहेत. पांढ-या मकब-यावर जागोजागी काळे ठिपके पडल्याने त्याचे सौंदर्यच बाधित झाले आहे. समाधीच्या चारही कोप-यांवर आकर्षक नक्षीकामाने नटलेल्या अष्टकोनी मिना-यांचेदेखील हेच हाल आहेत.
मुघलकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून बीबी का मकबरा ओळखला जातो. देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्तुती आणि वर्णन ऐकून पर्यटक मोठ्या अपेक्षा ठेवून येथे येतात; पण येथील वाताहत पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो हे नक्की.
मकब-याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शायर बशर नवाज लिहितात,
‘मकबरा गुस्ल करे नूर की फुहारो में,
रक्स करती रहे नकहत (खुशबू),
इन्हीं गुलजारों में.’
आज खरंच अशी परिस्थिती आहे?
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
मकबरा निर्माण होऊन साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षे झाल्याने वास्तूची झीज होणे स्वाभाविक आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणेदेखील शक्य आहे. देशातील महत्त्वाच्या स्थळांपैकी एक असणाºया बीबी का मकबºयाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. मकबºयाच्या उंचवट्यावरील लाल दगडाचे कठडे अनेक ठिकाणी मोडले आहेत, तर काही चिरे कधीही पडतील, अशा धोकादायक स्थितीत आहेत. त्यावर कायमस्वरूपी इलाज करण्याऐवजी तात्पुरता डागडुजीचा उपाय केला जातो. तारा आणि पाईपने कठडे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतिहासप्रेमींनी समोर येण्याची गरज
औरंगाबादचे मुख्य पर्यटन आकर्षण असणा-या बीबी का मकब-याच्या संवर्धनासाठी शहरवासीयांना एकत्र येण्याची गरज आहे. जर अशीच वाताहत सुरू राहणार असेल तर शहरातील इतर अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मकबरादेखील एक शोकांतिका बनून राहील. ज्याप्रमाणे ताज महालाच्या संवर्धनासाठी, सौंदर्यकरणासाठी मेहनत घेतली जाते तसे मकबºयाच्या बाबतीत का प्रयत्न केले जात नाही? असा सवाल इतिहासप्रेमी विचारत आहेत. मकबºयाला गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादकरांनी आत्मपरीक्षण करून एकत्र येण्याची गरज आहे.
https://www.dailymotion.com/video/x84577e