धीरज परब/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 22 - मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी नगरसेविका व भाजपाच्या पदाधिकारी सुरेखा यशवंत गायकवाड (52) रा. सिल्वर पार्क, मीरा रोड व त्यांच्या मुलीस सुरेखा यांचे वडील, भाऊ, बहीण, भावोजी, भावजय आदी नातलगांसह पालिका अधिका-याने मारहाण केल्याचा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांना मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असुन सुरेखा यांनी अनधिकृत बांधकाम, हातगाडी लावल्याच्या तक्रारी तसेच गावच्या जमीनीचा वाद या सर्व प्रकारां मधुन ही मारहाण झाल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे त्यांचा भाऊ आणि भावजयने नुकताच भाजपात प्रवेश केला असुन मारहाणी मागे राजकिय वादंग देखील कारणीभूत असल्याचे सांगीतले जाते. सुरेखा गायकवाड ह्या पुर्वी काँग्रेसच्या नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती सभापती होत्या. काँग्रेस सोडुन त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात त्यांना पालघर-ठाणे जिल्हा उपाध्यक्षचे पद देण्यात आले आहे. जवळच चंद्रेश अॅकॉर्ड मध्ये त्यांचे दुकान असुन ते भाडय़ाने दिले आहे. पुढिल वर्षात पालिका निवडणुक असल्याने गायकवाड ह्या इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे दुकानाच्या एका भागात त्यांनी आपले भाजपाचे कार्यालय सुरु केले आहे. गायकवाड यांनी त्यांच्या दुकाना समोरच भिजलेल्या कडधान्याची हातगाडी लावणारया भाऊ महेंद्र शिरोळेची (रा. चंद्रश अॅकॉर्ड बि. क्र. 13) तक्रार महापालिकेत केली होती. महेंद्र यांनी आपल्या राहत्या घरा पेक्षा जास्त वाढिव बांधकाम केल्याने रहिवाशांनी चालवलेल्या तक्रारी प्रकरणी देखील गायकवाड यांनी आमदार नरेंद्र मेहतांना कारवाई साठी सांगु असे आश्वासन दिले होते. गावच्या जमीनीचा हिस्सा मयत भावाच्या मुलांना न दिल्याने गायकवाड ह्या वडिल किसन शिरोळे यांना सतत बोलत होत्या. तर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पराडकर यांच्या विरोधात पण त्यांनी तक्रार केली होती . नुकताच भाऊ महेंद्र व त्याची पत्नी तेजस्वीनी यांनी महापौर गीता जैन, भाजपा मंडळ अध्यक्ष किरण चेऊलकर आदिंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. या सर्व बाबीं वरून त्यांचा व नातलगांमध्ये वाद होता. बुधवारी रात्री सुरेखा गायकवाड ह्या आपली मुलगी माधवी (३०) हिच्यासह दुकाना बाहेर बसल्या होत्या. त्याचवेळी गायकवाड यांचे वडिल किसन शिरोळे (72), भाऊ महेंद्र शिरोळे, भावजय तेजस्वीनी शिरोळे, भाचा रितीक शिरोळे (सर्व रा. चंद्रश अॅकॉर्ड बि. क्र. 13), बहिण दिपा पोळ, भावोजी अरविंद पोळ, भाची हस्ता पोळ ( सर्व रा. सिल्वर पार्क) व पराडकर हे तेथे आले. उपरोक्त सर्व गोष्टींचा राग व केलेल्या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी आलेल्या नातलग व पराडकर यांनी अचानक शिवीगाळ व धक्काबुक्की करत गायकवाड आणि मुलगी माधवी हिला लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण सुरु केली. आजूबाजूचे लोक जमल्यावर मारहाण करत सर्वजण निघून गेले. या प्रकरणी गायकवाड यांच्या हाताला फेक्चर झाले आहे. त्यांनी मीरारोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
VIDEO- भाजपा पदाधिकारी सुरेखा गायकवाड आणि त्यांच्या मुलीला मारहाण
By admin | Published: December 22, 2016 10:22 PM