ऑनलाइन लोकमत लातूर, दि. 21 - काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथून लावत लातूर महापालिका ताब्यात घेणाºया भाजपने शुक्रवारी जोरदार विजयोत्सव साजरा केला़ लातुरातील मुख्य रस्ते सायंकाळपर्यंत झेंडे, गुलाल अन् कार्यकर्त्यांच्या उत्साह वर्षावात न्हात होते़ एकिकडे भाजपकडून जोरदार विजय साजरा केला जात असतानाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही नगरसेवकांच्या विजयाचा तुकड्या-तुकड्यात जल्लोष साजरा केला.
शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली़ तेव्हापासून विजयाची खात्री असणाºया उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी झेंडे, गुलालाची व्यवस्था करुन ठेवली होती़ फेºयांच्या एकूण मतमोजणीनंतर मिळणाºया आघाडीवरही केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात होता़ अत्यंत चुरशीची निवडणूक असल्याने जल्लोषातही चुरस पहायला मिळाली़ भाजपच्या उमेदवारास आघाडी मिळाल्याची घोषणा होताच भाजप कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते़ त्यामुळे चेव येऊन काँग्रेस कार्यकर्तेही त्यांच्या उमेदवाराच्या आघाडीवर जल्लोष साजरा करीत होते़ दरम्यान, एकेक निकाल बाहेर येऊ लागताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर फटाके फुटू लागले, गुलालाने आसमंत गुलाबी होवू लागले अन् हवेत झेंडे फडकू लागले़ विजयाच्या घोषणेनंतर उमेदवारास खांद्यावर उचलून घेत गुलालाची अंघोळ घालत कार्यकर्ते बार्शी रोडने शिवाजी चौकाकडे वाजत-गाजत निघाले़ चौका-चौकात फटाके फोडून विजयी उमेदवारांचे जत्थे पुढे सरकत होते़ पाच नंबर चौक, एक नंबर चौक, पाण्याची टाकी, दयानंद गेट, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, गांधी चौक, गंजगोलाई, शाहू चौक, सम्राट चौक, विवेकानंद चौक, आदर्श कॉलनी गेट, राजीव गांधी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, अशा प्रमुख चौकांसह आपापल्या प्रभागांतही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली़ भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषात विजयोत्सव दिसून येत होता़ तर काँग्रेस कार्यकर्त्यांना सामुहिक जल्लोष करण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी आपापल्या विजयी उमेदवारांसोबत जल्लोष केला़
विजयाच्या धगीत कचरा पेटला
उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत होता़ या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येत होती़ परंतु, ही आतषबाजी करताना मतमोजणी केंद्राच्या बाहेरील रस्त्याशेजारी असलेल्या कचºयात एक जळता फटाका उडाला अन् त्याच्या धगीने कचरा पेटला़ याठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाने तात्काळ पाण्याने ही आग विझविली़
https://www.dailymotion.com/video/x844vz4