ऑनलाइन लोकमत/हनुमंत देवकर
पुणे, दि. 27 - सापाच्या विषाची तस्करी करणा-या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. खराबवाडी येथील सारा सिटीमध्ये छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. चाकण पोलीस, सर्पमित्र आणि वनविभागाने संयुक्तीरित्या ही कारवाई केली आहे. छापेमारीदरम्यान या टोळीकडून 40 घोणस जातीचे साप, 31 कोब्रा, विष असलेल्या तीन बाटल्यादेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपी रणजीत खारगे व धनाजी अभिमान बेळकुटे या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थर्टी फर्स्टची तयारी
कोब्रा वेनम म्हणजे सापाचे विष, याची पावडर करुन दारू अथवा इंजेक्शनच्या स्वरुपात घेतले जाते. नवी दिल्ली आणि गोव्यात कोब्रा वेनमला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता याची मागणी विद्यानगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यातील उच्चशिक्षित तरुण-तरुणींमध्ये वाढू लागली आहे. या पावडरला K-72, K-76 अशी नावे आहेत. तसेच याची किंमती 25 ते 30 लाख रुपये इतकी आहे.