ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या वतीने आयोजित अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी स्टॉल्स लावले असून, प्रदर्शन बघण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कॅशलेस होण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. कृषी विद्यापीठाच्या मैदानात २७ डिसेंबर पासून झालेले अॅग्रोटेक कृषी प्रदर्शन २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना कृषी विषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्दिष्टाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देतात. नव्या नोटा चलनात आल्यानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेने बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त ग्रामीण भागात व्यवस्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी याठिकाणी शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसे करावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉल्स लावले आहेत. ज्यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक आदिंचा समावेश आहे. कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना या स्टॉल्सवर रोखी ने व्यवहार न करता कॅशलेस व्यवहार कसे करावेत यासंदर्भात बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. कॅशलेस होण्यासाठी कोणकोणती माध्यमे उपलब्ध आहेत, त्यांचा कसा उपयोग करावा हे प्राजेक्टरच्या सहाय्याने माहितीपटाच्या माध्यमातून दाखविले जात आहे. बँकांनी लावलेल्या या स्टॉल्सना शेतकऱ्यांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844mph