ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ - दीपावलीच्या पूर्वसंध्येला शाहूपुरी पाच बंगला तथास्तू कॉर्नर येथील आय पॅलेस मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख किंमतीचे ६९ महागडे मोबाईल चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. येथील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये चौघा चोरट्यांची हालचाल कॅमेराबंद झाली असून, त्यांच्या चेह-याला मास्क आहे. दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केली आहे. त्यामळे हे सराईत चोरटे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अलीकडच्या काळात घरफोड्या, चोºया, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवासी, व्यापारी व प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शाहूपुरी पाच बंगला परिसरात तथास्तू कॉर्नर येथील इमारतीमध्ये तळमजल्यावर आय पॅलेस मोबाईल शॉपी आहे. सागर सुकुमार पाटील (रा. रुक्मिणीनगर), सिद्धार्थ गुणवंत शहा (रा. रुईकर कॉलनी), रवींद्र देशमुख (रा. फुलेवाडी) या तिघांनी भागीदारीमध्ये २ ऑक्टोबरला मोबाईलचे दुकान सुरू केले. दिवाळीनिमित्त त्यांनी विविध कंपनींचे मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसह इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. दुकानात सहा कामगार आहेत. मालक सागर पाटील, रवींद्र देशमुख व कामगार मयूर इंगवले यांच्याकडे दुकानाच्या चाव्या असतात.
शुक्रवारी (दि. २८) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून सर्वजण घरी गेले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कामगार इंगवले हा दुकान उघडण्यास आला असता शटर उचकटलेले दिसले. आतमध्ये जाऊन पाहिले असता कपाट फोडून त्यातील किमती मोबाईल गायब केले होते. हा प्रकार पाहून त्याने मालक सागर पाटील यांना फोन केला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची वर्दी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले, अमृत देशमुख, तानाजी सावंत, दिनकर मोहिते, अनिल देशमुख, उपनिरीक्षक सुशीलकुमार वंजारे घटनास्थळी आले. त्यांनी मोबाईल शॉपीची पाहणी केली. दुकानाचे शटर उचकटण्याची पद्धत सराईत चोरट्यांची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. याप्रकरणी अधिक तपास हवालदार रवी पाटील, दिवाकर होवाळे करीत आहेत.
वीस मिनिटांत गुंडाळला डाव
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एका चोरट्याने पहाटे चार वाजता दुकानात प्रवेश केला आहे. दुकानाच्या बाहेर तिघे थांबले आहेत. चौघांनीही चेहºयाला मास्क बांधला आहे. आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने दुकानातील साहित्यांची पाहणी करून ६० ते ७० हजार किमतीचे मोबाईल ठेवलेले कपाट फोडून ते पिशवीत भरले. अवघ्या वीस मिनिटांत चोरट्यांनी डाव गुंडाळल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
पाहणी करून चोरी
दुकानात दोन लाख किमतीचे तीन लॅपटॉप, मोबाईल चार्जर, हेडफोन होते. अशा सुमारे ३० लाख किमतीच्या वस्तूंना चोरट्यांनी हात लावलेला नाही. त्यामुळे चोरट्यांनी यापूर्वी दुकानात ग्राहक म्हणून येऊन पाहणी करून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
सुरक्षा विमा उतरताच चोरी
नवीन मोबाईल शॉपी सुरू केल्याने दुकान मालकांनी साहित्याचा सुरक्षा विमा शुक्रवारीच उतरून संबंधित कंपनीला रकमेचा धनादेश दिला आहे. विमा उतरून एक दिवस पूर्ण होताच चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडल्याने दुकान मालकांना नुकसानभरपाई मिळेल अशी खात्री नाही.