ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासहीत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण भरताच हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित आहेत.
""मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही"", अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
""माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे"", अशी प्रतिक्रियादेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी नेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरुन मुंबईच्या दिशेने उड्डाण भरत असताना अचानक कोसळलं. सकाळी 11.58 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सर्वजण सुरक्षित असून पायलट किरकोळ जखमी झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारीपासून लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्काम होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा
सकाळी 7.30 वाजता
हलगरा गावात श्रमदानासाठी दाखल
श्रमदानानंतर औराद शहाजानी, हंगरगा, अनसरवाडा गावांना दिली भेट
गावांना भेट दिल्यानंतर स्थानिकांसोबत साधला संवाद
सकाळी 11.45 वाजता
मुंबईकडे रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले
सकाळी 11.58 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं भरलं उड्डाण
50 ते 60 फूट उंचीवर गेल्यानंतर हेलिकॉप्टर कोसळलं
रस्त्यावरील वीज खांबांवरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले आणि काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीज डीपी व ट्रकच्या मध्यभागी हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सचिव प्रवीण परदेशी व अन्य दोन जण होते. दरम्यान, या अपघातामुळे भरत कांबळे या स्थानिकाच्या घराच्या भिंती पडल्या आहेत.
दरम्यान, या अपघातापूर्वी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा तालुक्यातील हलगरा गावात होते. येथे श्रमदान केल्यानंतर त्यांनी नागरिकांसोबत संवादही साधला. निलंगा तालुक्यातील हलगरा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हाती टिकाव, खोरे घेऊन श्रमदान केले. राज्यात आजपासून भाजपाच्या वतीने "शाश्वत शेती- समृद्ध शेती" अभियानांतर्गत शिवारसंवाद सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट ग्रामस्थांनी संवाद साधत जलयुक्त शिवार अंतर्गत कामाची माहिती जाणून घेतली.
गावाच्या पुढाकारातून झालेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. जलयुक शिवाराच्या कामातून गावाचा कसा कायापालट होतो, हेच हलगरा गावातील नागरिकांनी दाखवून दिले आहे. राज्यातील सरकार हे शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील इतर गावाची हलगरा गावचा आदर्श घेतला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी नागरिकांनी संवाद साधताना म्हणाले.