ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - अंगावर थंडगार पाण्याचे फवारे... बैलगाडीतून सफारी... जादूचे खेळ..., अशा उत्साही वातावरणात कचरावेचक मुलांनी रमणमळा येथील वॉटर पार्क येथे ‘फुल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते बालदिनानिमित्त ड्रीम वर्ल्डने सामाजिक बांधीलकी जपत कचरावेचक कुटुंबातील मुलांसाठी ‘फन फेअर’चे आयोजन केले होते.
फन फेअरचे उद्घाटन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी सूर्यण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अवनी संस्थेचे विश्वस्त संजय पाटील, ड्रीमवर्ल्ड, वॉटर पार्कचे जनरल मॅनेजर बालन नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर ‘कोणतेही खेळ मनसोक्त खेळा’ अशी परवानगी मिळताच मुले सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भान हरपून दंग झाली. या ठिकाणी मुलांनी पाण्यात मनसोक्त उड्या मारल्या. मोठा लोखंडी व ब्रेक डान्स पाळणा, जंपिंग बलून अशा खेळण्यांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. यासह बैलगाडी सफारी करण्यासाठी बालकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर सभागृहात विविध गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी सांयकाळपर्यंत झोपाळ्यावर बसणे, पकडा-पकडी असे अनेक खेळ खेळले.