ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 - चीन या देशाच्या मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये बऱ्याच व्यापारी संघटनांनी चीनचा माल खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात शनिवारी जिल्हा व्यापारी महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातही चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया, सुरेश चिरमाडे, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी चिनी माल खरेदी, विक्री व वापर करू नये. तसेच भारतीय उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यंदाच्या दिवाळीमध्ये चीनच्या फटाक्यांना हद्दपार करण्यात आले असून देशात तयार झालेल्या फटाक्यांचीच विक्री करणार असल्याचा निर्धार विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा फटाक्याचे भाव पाच टक्क्याने कमी झाले असून फॅन्सी फटाक्यांना अधिक मागणी असल्याची माहिती फटाके विक्रेत्यांनी ‘लोकमत’शीबोलताना दिली. जळगावात तामिळनाडूतील शिवकाशी येथील ८० टक्के तर २० टक्के फटाके राजकोट, ग्वॉलिअर, तेरखेडा, अहमदाबाद, दिल्ली येथून येत आहे. इतकेच नव्हे साधे टिकली व रोल तसेच बंदूकदेखील अलीगड व मुंबई येथून येत आहे. चीनच्या कोणत्याच वस्तू मागविल्या जात नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. भाव झाले कमीएरव्ही दरवर्षी फटाक्यांचे भाव वाढतात, मात्र यंदा भाव घसरल्याचे चित्र आहे. फटाक्याच्या कच्च्या मालाचे भाव कमी झाल्याने फटाक्याचेही भाव कमी झाले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच यंदा पाऊस चांगला झाल्याने फटाके बाजारातही मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून होत आहेत. यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय फटाक्यांना अधिक मागणी असून विक्रेत्यांकडूनच चीनचे फटाके विक्री केले जाणार नाही. फटाक्यांचे भाव पाच टक्क्यांनी कमी झाले असून फॅन्सी फटाक्यांना जास्त पसंती आहे. - युसूफ मकरा, होलसेल फटाके विक्रेते.
VIDEO- जळगावात ‘चीन’च्या मालावर बहिष्कार
By admin | Published: October 23, 2016 12:38 PM