Election Commission ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य काही घटकांकडून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्जही दाखल केला आहे. त्यातच ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ईव्हीएम हॅक केल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं सांगत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
"सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केल्याचा चुकीचा आणि निराधार दावा केला जात आहे. महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर मुंबईत व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, "ईव्हीएमला वायफाय, ब्ल्यूट्यूथ किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने जोडता येत नाही. त्यामुळे ईव्हीएम हॅक होण्याचा प्रश्नच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने अनेकदा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे. ईव्हीएमबाबत असलेल्या सर्व शंकांचं निरसन व्हावं, यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर सर्व माहिती दिली आहे."
दरम्यान, ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरवत निराधार दावा केल्यामुळे याच व्यक्तीविरोधात दिल्लीतही २०१९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता, असंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.