ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २९ - शहरात टवाळखोरांचा वाढता उपद्रव तसेच सोनसाखळ्या चोऱ्यांसारखे वाढते प्रकार या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतूक पोलीसांनी सैराट वाहने हाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून गेल्या सहा महिन्यात एक कोटी रूपयांहून अधिक रूपयांचा दंड जमा केला आहे.शहराच्या काही भागात दुचाकी वाहनचालक बेफामपणे वाहने चालवतात. विशेषत: कॉलेजरोडसह गंगापूररोड आणि रूंद रस्त्यांवर वाहने जोरात असतात. त्यातून एका महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्याने गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक रस्त्यावर उतरले होते. शिवाय आसाराम बापु पुलाजवळील जागा, सोमेश्वर, अशा अनेक भागांमध्ये दुचाकी सैराट हाकाणाऱ्यांच प्रमाण वाढले आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यात महिलांच्या सोनसाखळ्या खेचणे, त्यांची छेड काढणे आणि चोरीच्या मोटरसायकली फिरवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतुक पोलीसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून दुचाकी आणि चारचाकी तपासणी मोहिम सुरू केली आहे. वाहनचालकाकडील कागदपत्रे तपासतानाच गाडीचे कर्कश हॉॅर्न तसेच सायलेंसरमध्ये बदल करून फायरींगमध्ये बदल करणे अशा अनेक कारणावरून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलीसांची दंडात्मक कारवाईची रक्कम एक कोटी रूपयांवर गेली आहे. (प्रतिनिधी)