ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.13 - हजारो कोटी रुपयांची सट्टेबाजी करणारा डब्बा व्यापारी रवी अग्रवाल आणि त्याचा साथीदार गोपी मालू या दोघांविरुद्ध शुक्रवारी कळमना पोलिसांनी गोळीबार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर या दोघांनाही अटक झालेली नव्हती. अग्रवाल आणि मालूने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
गुन्हेशाखेने १२ मे २०१६ ला एल-७ समूहासह विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. चौकशीत या गोरखधंद्याचा सूत्रधार रवी अग्रवाल असल्याचे उघड झाले होते. गुन्हा दाखल होताच अग्रवाल आपल्या काही खास साथीदारांसह फरार झाला होता. कोर्टातून अटकपूर्व जामिन मिळाल्यामुळे तो पुन्हा नागपुरात परतला.या पार्श्वभूमीवर, कळमन्यातील आपल्या आलीशान निवासस्थानाच्या बालकनीतून रवी अग्रवाल आणि त्याचा साथीदार गोपी मालू या दोघांनी दोन माउझर हातात धरून गोळया झाडल्या. गोळी झाडताना मालू याने ‘हमारे दुश्मनोंको लगता था के अब हम कभी बाहर (पोलिसांच्या कस्टडीतून) आ नही सकते... ये उनके नाम...!‘ असे म्हणत गोळी झाडली. हा व्हीडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला. लोकमतच्या हाती हा व्हीडीओ लागला. त्यासंबंधाचे वृत्तही लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, हे प्रकरण पेटल्याचे ध्यानात आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
अग्रवाल, मालू फरार
या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री सरकारतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी कळमना ठाण्यात स्वत:च फिर्याद दिली आणि त्यावरून अग्रवाल आणि मालूविरुद्ध शस्त्र कायदा १९७० च्या कलम ३० नुसार (कायद्याचे उल्लंघन करणे) आणि भादंविच्या कलम ३३६ अन्वये (दुस-याच्या जीवाला दुखापत होऊ शकते, अशी धोकादायक कृती करणे) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हे दाखल होऊ नये म्हणून अग्रवाल आणि मालूने शुक्रवारी सकाळपासून ती फटाके फोडण्याची पिस्तूल असल्याचा कांगावा केला होता. रात्री गुन्हा दाखल होणार याची कुणकुण लागल्यामुळे हे दोघेही फरार झाले. या गुन्ह्यामुळे अग्रवालचा जामिन रद्द होऊ शकतो, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.