ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चे गणेशचतुर्थीच्या पहिल्याच दिवशी दर्शन मिळावे म्हणून आदल्यादिवसापासूनच भाविकांनी नवसाच्या रांगेत एकच गर्दी केली आहे. काळाचौकीच्या आंबेवाडीपासून रांग सुरू झाली असून, काळेवाडीपर्यंत ही रांग आहे.
पहाटे पूजा झाल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांना सोडण्यात येईल, अशी माहिती लालबाग मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली. अंतर्गत सुरक्षेसाठी रात्री ९ वाजता रांग मुख्य मंडपाच्या दिशेने सोडण्यात येईल.
नवसाच्या रांगेतील पहिल्या भक्ताने तीन ते चार दिवस आधीपासून इथे नंबर लावला होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आलटून-पालटून या रांगेत उभे होते. दरवर्षी आदल्यादिवसापासून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नवसाच्या रांगेत उभे असतात. यंदाच्या वर्षीही लाखो भाविक इथे दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्यासाठी मंडळाने दरवर्षीप्रमाणे व्यवस्था केली आहे.