ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - भायखळ्यातील धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाच्या माऊलीचे गुरूवारी रात्री मोठ्या जल्लोषात आगमन झाले. नाशिक ढोलांच्या तालावर आणि अंध मल्लखांबपट्टूंनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित भक्तांची मने जिंकली.
यंदा मंडळाचे ३९ वे वर्ष असून गिरणी कामगारांनी सुरू केलेला नवरात्रौत्सवाचा वारसा येथील युवा पिढी पुढे घेऊन जात आहेत. आगमन सोहळ्यात मंडळाने उरी हल्ल्यातील शहीदांसोबत शहीद विलास शिंदे आणि महाड दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनमोल रत्न या संस्थेच्या अंध मल्लखांबपट्टूंनी सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आगमन सोहळ्यातील खास आकर्षण ठरले. चालू वाहनावर सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांची बोटे तोंडात गेली. टाळ्यांच्या कडकडाटात
या मल्लखांबपट्टूंना प्रोत्साहित केले.
साईधाम ढोल पथकाच्या नाशिक ढोल आणि ताशांच्या तालावर तरूणांसोबत ज्येष्ठांनीही ठेका धरला होता. वायू प्रदूषण टाळण्यासाठी मंडळाने यंदा फटाक्यांना बगल दिली होती. याउलट विद्युत रोषणाईच्या सहाय्याने मंडळाने प्रकाश झोतात माऊलीचे आगमन केले.
गेल्या वर्षभरात विभागातील नागरिकांसाठी मंडळाने दोन वेळा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्यात पहिल्यांदा आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर रहेजा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने स्थानिकांचे संपूर्ण शरीर तपासणी करण्याचे कामही मंडळाने करून दाखवले, अशी माहिती धाकू प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाचे चेअरमन अशोक विचारे यांनी दिली.
दुष्काळग्रस्तांना मदत :
गेल्या वर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा दाह मंडळानेही सोसला. आर्थिक मदतीचा ओघ कमी असतानाही दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मंडळाने नवरात्रीचे नऊ दिवस एक विशेष दानपेटी मंडपात ठेवली होती. त्यात भाविकांनी जमा केलेल्या रकमेत मंडळाने वर्गणीरूपातील रक्कमही मिळवली. अशा प्रकारे एकूण ७७ हजार ७७७ रुपयांचा धनादेश 'नाम' फाउंडेशनला देत मंडळाने
दुष्काळग्रस्तांच्या मदतीत खारीचा वाटा उचलला.