राजेश खराडेबीड, दि. 24 - गणेशोत्सवाच्या तयारीला हळू हळू वेग येत असून दरवर्षी बीडमध्ये गणेशाच्या मुर्तीचा एक वेगळाच ट्रेंड असतो. यावर्षी शहरातील मुर्तीकारांनी तयार केलेल्या पेशवा गणपती या मुर्तीला सर्वाधिक मागणी होत असून सिंहासनावर विराजमान असलेली गणेशाची ही पेशवा मुर्तीच्या अॅडव्हान्स बुकींगसाठी मुर्तीकारांकडे गर्दी वाढू लागली आहे. पोळा, गणपती, गौरी आवाहान सण तोंंडावर आल्याने बाजारात रेलचेल पाहवयास मिळत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मूर्तींना आकार दिला जात असून ग्राहकांच्या मागणीनुसार ५ इंचापासून १० फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती बनविण्यात आल्या असल्याचे मूर्तीकार दिपक चित्रे यांनी सांगितले. वडिलोपर्जित व्यवसाय असून श्रावण महिन्यापासून एका-मागून एक सण येत असल्याने त्याची तयारी सहा महिन्यापासून केली जाते. व्यापार-व्यवसायिकांनी गणेश मूर्तीची खरेदी केली आहे तर गणेश मंडळांनी बुकींग केली असल्याचे चित्रे म्हणाले. दरवर्षी नवा ट्रेंड येत असून यंदा नव्याने दाखल झालेल्या पेशवा गणपतीचीे क्रेज निर्माण झाली आहे. याकरिता आवश्यके असलेले पी.ओ.पी. राजस्थान तर नारळाचा कात्या केरळातून आयात करावा लागतो. वाहतूकीचा खर्च वाढल्याने १० टक्यांनी दरात वाढ झाली आहे. शहरात अजून मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले नसली तरी मूर्तींकारांकडे व्यापाऱ्यांची गर्दी होत आहे. वाढती मागणी पाहून मूर्तीकरांनी यंदा मूर्तीची संख्या वाढवली आहे. अद्यापपर्यंत ३ हजार लहान-मोठ्या मूर्ती बनविल्या असल्याचे चित्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
VIDEO - बीडमध्ये यंदा पेशवा गणपतीच्या मुर्तीला मागणी
By admin | Published: August 24, 2016 6:42 PM