मनीषा म्हात्रे , मुंबईसिद्धिविनायक मंदिरात केलेली विदेशी फुलांची आरास पाहण्यासाठी मुंबईसह देश-विदेशातून बाप्पाचे भक्त गर्दी करत असल्याच्या बातम्या वाचून आलेल्या महिला चोरांच्या टोळीने भक्तांना टार्गेट केले आहे. दादर पोलिसांनी अटक केलेल्या तीन महिलांच्या चौकशीत ही बाब समोर आली. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या परिसरातही अशीच परिस्थिती असून चोरीच्या तब्बल ८२ घटनांची नोंद झाल्याने याला आळा कसा घालायचा या विचाराने पोलीस चक्रावले आहे. श्रीलंका, द. आफ्रिका, न्यूझिलंड, बँकॉकमधून सिद्धीविनायकाच्या चरणी विदेशी फुलांची भेट येत आहे. विदेशी फुलांच्या आर्कषक सजावटीच्या बातम्यांमुळे देशभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचाच फायदा चोर घेत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दादर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शांतिलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिपाली कुलकर्णी, समशेर तडवी यांचे पथक कार्यरत आहे. पथकातील हवालदार अमोल शेगोकार यांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने संशयितांना हेरुन त्यांच्यावर नजर ठेवली. बुधवारी सापळा रचून यापैकी तीन महिलांना रंगेहाथ अटक करण्यास पथकाला यश आले. अहमदाबाद येथील धनलक्ष्मी परमार (५०), ज्योती परमार (४०) यांच्यासह मथुरातील लाडो रतनसिंग कौर (४२) या तिघांच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या तिघीही अभिलेखावरील सराईत आरोपी आहेत. त्यांच्याकडून २५ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच ठिकाणांहून त्यांनी १५०-२०० भाविकांना लुटल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
VIDEO : चोरट्यांच्या टार्गेटवर भक्त
By admin | Published: September 15, 2016 3:36 AM