ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 21 - महापालिका निवडणुकीचे धूमशान सुरू असून, प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात आहेत. अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी इच्छुकांचे हर त:हेचे प्रयत्न सुरू आहेत. आता बडीशेपच्या पुडीवरही राजकीय पक्षांचे चिन्ह छापण्यात आले असून, यामार्फत मतदारांर्पयत पोहोचण्याची राजनिती पिंपरी-चिंचवड शहरात अवलंबली जाणार आहे.
महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इच्छुकांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार केला जात आहे. मात्र, प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खर्चावरही मर्यादा ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे खर्चाला आवर घालावा लागतो. प्रचारात प्रमाणापेक्षा अधिक खर्च झाल्यास उमेदवार अडचणीत येतो. त्यामुळे इच्छुकही कमी खर्चात प्रचार करण्यावर भर देत आहेत. यासाठी कमी खर्चातील प्रचार साहित्य असणोही गरजेचे आहे.
बडीशेपमुळे मोठ्या खर्चाला फाटा
यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव भागातील एका विक्रेत्याने नवीन फंडा अवलंबला आहे. चक्क विविध राजकीय पक्षांचे चिन्ह छापलेल्या बडीशेपची विक्री केली जात आहे. जेवणानंतर रोज हौसेने बडीशेप खाणा-यांना आता राजकीय पक्षाच्या चिन्हांच्या पुडीतील बडीशेप खायला मिळणार आहे. या पुडीची किंमत रुपया असली, तरी होलसेल भावात ती अवघ्या 25 ते 50 पैशांना पडते. निवडणुकीत उमेदवाराकडून केल्या जाणा-या खर्चाचा तपशील निवडणूक विभागाला सादर करावा लागतो. त्यामुळे मोठ्या खर्चाला फाटा द्यावा लागतो. अशातच बडीशेपची किंमत कमी असून, पुडीवर संबंधित पक्षाचे चिन्हही आहे. यासह त्याची किंमत कमी असल्याने उमेदवाराला देखील सोयीचे झाले आहे.
बडीशेपद्वारे पक्षांचा प्रचार
यापूर्वी अगोदरपासून झेंडे, मोठे फलक यासह विविध वस्तूंच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आता तर बडीशेपच्या माध्यमातूनही प्रचार करण्यात येणार आहे. या नवीन फंड्यातून मतदारांनाही मतदान करण्यासाठी गळ घातली जात आहे. ही बडीशेप थेट पोटात जाणार असल्याने आपोआप मतदारांच्या ओठावर पक्षाचे चिन्ह येईल, अशी अपेक्षा इच्छुकांना आहे. त्यामुळे बडीशेफला चांगली मागणी मिळण्याची आशा आहे, असे विक्रते विवेक पिंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.