ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये, म्हणून एखाद्या तरुणीने आत्महत्या करणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. लालमहाल पुणे येथे हुंडाविरोधी चळवळी निमित्त तरुण तरुणींनी लाल महालातील जिजाऊच्या पुतळ्यासमोर हुंडा घेणार नाही व घेऊ देणार नाही, अशी शपथ घेतली
शिंदे म्हणाले, पुढील काळात कोणत्याही महिलेने आत्महत्या करू नये, यासाठी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकरी व कष्टकरी यांच्या मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा व मुलांचा शैक्षणिक खर्च राजर्षी शाहु महाराज जयंती २६ जुन रोजी संभाजी ब्रिगेड करणार आहे. तसेच महिलांसाठी मदत म्हणून संभाजी ब्रिगेड निर्भया हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. महिलांच्या सरंक्षणासाठी व न्याय हक्कासाठी यापुढे शेतक-यांचा पुत्र म्हणून संभाजी ब्रिगेड काम करणार आहे.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करून शितल वायाळ यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, संघटक सुभाष जाधव, संघटक, मोनिका निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्ष प्राची दुधाने, उपाध्यक्ष सुरेखा जुजगर, सुभाष भोसले, अॅड विकास शिंदे, प्रितम कोंढाळकर, विजय मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शीतल वायाळची आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षाच्या शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या मुलीने शेतातील नापिकी आणि आर्थिक विवंचनेचा कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत सकाळी उडी मारून तीने आपली जीवनयात्रा संपविली. मृत्यूपूर्वी तिने एक पत्र लिहून ठेवले असून त्यात तिने आपल्या घरची परिस्थिती विषद केली आहे.
दोन बहिणींचे कसे-बसे लग्न करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नासाठी कुणी कर्जही देत नाहीत.
कारण गेल्या ४ वर्षांपासून शेतातही काही पिकत नाही. त्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती न पहावल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तीने लिहिले आहे. आपण केलेल्या या कृत्यामुळे घरातील कुणालाही जबाबदार धरू नये असेही तिने शेवटी नमूद करीत आपले नाव लिहिले आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vq5