मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती, पाण्याचा प्रश्न अनेक चित्रपटांतून मांडण्यात आला. या विषयाचे वास्तव म्युझिक व्हिडीओतून मांडण्याचा वेगळा प्रयत्न करण्यात आला आहे. युवा नृत्यदिग्दर्शक अमित बार्इंग याने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार’ हा म्युझिक व्हिडीओ तयार केला आहे. ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, आगामी ‘लालबागची राणी’, ‘चीटर’ अशा चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून अमितने काम केले आहे. विवेक नाईक आणि सुहास सावंत यांनी गाणे गायले आहे. श्रेयस आंगणे यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, दोन चारोळ््याही लिहिल्या आहे. कवी सौमित्र यांनी या म्युझिक व्हिडीओसाठी चारोळ््यांना आवाज दिला आहे. विषयाचे गांभीर्य पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ करताना कोणताही व्यावसायिक हेतू ठेवलेला नाही. विदर्भ, मराठवाड्यातले भीषण वास्तव समोर यावे, या विचाराने तिथेच जाऊन चित्रीकरण केले आहे, असे अमितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निसर्गसंवर्धन, पाण्याचा जपून वापर करणे ही आपली जबाबदारी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न व्हिडीओतून केला आहे. हा संदेश पूर्ण जगासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
व्हिडीओमधून मांडला ‘दुष्काळदाह’
By admin | Published: May 16, 2016 3:04 AM