जळगाव - मधमाशी चावणं धोकादायक असतं, पण तीच मधमाशी तुमचा आजार दूर करत असेल तर..? अनेक माणसं ही वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असतात. काहींनी कितीही पैसे खर्च केले आणि कितीही उपचार घेतले तरी त्या आजारावर फरक पडत नाही. पण एखादी अशी काही गोष्ट कमाल करते आणि त्या आजारापासून तो व्यक्ती मुक्त होतो. नेमकं माजी मंत्री एकनाथ खडसेंसोबत असेच घडले.
मधमाशीने खडसेंचं आयुष्यचं बदललं. एकनाथ खडसेंना अनेक वर्षांपासून गुडघेदुखी, पाठदुखीचा त्रास होता. तुम्ही त्यांचे व्हीलचेयरवर बसलेले फोटो पाहिले असतील. तसेच त्यांना चालताना होणारा त्रासही अनेकांनी पाहिला असेल.. पण आता गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होत नाही असं खडसेंनी सांगितलं आणि त्यामागचं कारण ठरलंय, मधमाशी उपचार पद्धत. मधमाशी चावणं हे धोकादायक असतं हे आपण ऐकलं असेल. पण त्यामुळे उपचार होतो.. हे अनेकांना माहित नाहीये. एकनाथ खडसेंनी याच उपचार पद्धतीमुळे आपल्या आजारांवर मात केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, गेले अनेक वर्षापासून मला गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होता. त्यामुळे अनेकदा मला समस्या जाणवायची. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात जिथे जिथे उपचार सांगायचे तिथे जायचो. परंतु मधुमाशांचा उपचार केला जातो हे औरंगाबादच्या डॉक्टरांनी सांगितले. हा नैसर्गिक उपचार असून त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हा उपचार केल्यापासून माझा त्रास ८० टक्के कमी झाला. पुन्हा कधी त्रास झाला तर मधमाशी आणायची आणि तिला चावायला सांगायचं असं त्यांनी गमंतीने म्हटलं.
औरंगाबाद येथील डॉक्टर कुलकर्णी व डॉक्टर नांदेडकर यांच्या मधुमक्खी चिकित्सा या प्रणालीचा उपचार घेतल्याने एकनाथ खडसे हे गुडघेदुखीच्या आजारापासून तंदुरुस्त झाले आहेत. अनेक वर्षापासून एकनाथ खडसे यांना गुडघेदुखीचा आजार होता, परंतु मधुमक्खी चिकित्सा या प्रणालीच्या उपचार घेतल्याने एकनाथ खडसे हे गुडघेदुखी त्रासापासून तंदुरुस्त झाल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे मधमाशी चावणं हे धोक्याचं असलं तरी नैसर्गिक उपचार म्हणून याकडे पाहता येऊ शकते.