ऑनलाइन लोकमत/उद्धव फंगाळ
मेहकर (बुलडाणा), दि. 11 - मेहकर येथे प्रसिद्ध नर्तकी कंचनीचा महाल म्हणून शेकडो वर्षांपासून दोन मजली ऐतिहासिक वास्तू उभी आहे. ही वास्तू बघण्याकरिता देश विदेशातून पर्यटक येतात. मात्र, गत काही दिवसांपासून या वास्तूमध्ये गुप्तधन शोधणा-यांनी खड्डे खोदून ठेवले असून, यामुळे या वास्तूला धोका निर्माण झाला आहे.
मेहकर येथे शेकडो वर्षांपूर्वी कंचनी नावाची एक नर्तकी वास्तव्यास होती. तिचा नाच बघण्याकरिता दूरदरवरून राजे - महाराजे येत होते. हे महाराजे कंचनीचा नाच बघून सोने, चांदी, हिºयांच्या दागीण्यांची उधळण तिच्यावर करीत होते. काही वर्षांनी कंचनीचे वैभव वाढले. तिने तीन मजली ऐसपैस असा महाल बांधला. या महालातही घुंगरूच्या तालावर कंचनीच्या विशेष अदाकारीसह नाच व्हायला लागला. लोणार येथे कमळजा मातेचे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी अखंड दिवा लावण्यात येत होता. हा दिवा मेहकरमधील महालावरून पाहण्याची कंचनीची इच्छा झाली. तिने सात मजले बांधले. मात्र, दिवा पाहण्यासाठी गेली असता तिचा मृत्यू झाला, अशी अख्यायिका सांगण्यात येते. यावेळी तिच्याजवळील दागिने या महालाखाली जमिनीत गाडल्याची दंतकथा येथे प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुप्तधनाचा शोध घेणारे अनेकजण महालात खड्डे खोदतात. कंचनीचा महाल ही ऐतिहासिक वास्तू असून, या महालाची बांधकाम शैली पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. मात्र, या महालात ठिकठिकाणी खड्डे करण्यात आल्याने पर्यटकांना आतमध्ये फिरताना अडचणींचा सामना करावा लागतो.याकडे पुरातत्व खात्याने लक्ष पुरविण्याची गरज आहे.