ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 8 - नवी मुंबईतील गव्हाणफाटाजवळ रेल्वे रुळावर विजेचा खांब ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन मुंबई आणि उपनगरीय परिसरात रेल्वे मार्गावर मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याआधी मंगळवारी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याची घटना समोर आली होती.
जेएनपीटी बंदरात मालाची ने-जा करण्यासाठी या रेल्वेमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे घातापाताच कट शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दिवा घातपाताची उकल होईना
दिवा स्टेशन जवळ (दिवा फाटकापासून 700 मीटर अंतरावर) 25 जानेवारी रोजी एक मोठा अपघात टळला होता. रुळावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली. या घटनेनंतर घातपाताची शक्यता लक्षात घेता, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांनी तपासास सुरुवात केली.
मात्र, अद्यापही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. आतापर्यंत 30 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत, लोहमार्ग पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्था(एनआयएकडून) तपास करण्यात आला, परंतु अद्यापही पोलिसांना तपासात यश आलेले नाही.
कानपूर रेल्वे दुर्घटना; मुख्य संशयित अटकेत
कानपूर येथे नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा याला काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. समशूल नेपाळी नागरिक असून, दुबईने प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. समशूल पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा कथित एजंट आहे. आधी तो अपघात असल्याचेच अंदाज बांधले जात होते.
मात्र अन्य प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका गुन्हेगाराच्या जबानीतून हा घातपात असल्याचे निदर्शनास आले. नेपाळ पोलिसांच्या विशेष पथकाने होडा (४८) याला इतर तीन जणांसह अटक केली. होडाला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी अटक केली, असे पोलीस उप महानिरीक्षक पशुपती उपाध्याय यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
https://www.dailymotion.com/video/x84csle