ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 31 - निद्रा करी बाळ एकदंता सकळादी गुणसगुणा अशा सामूहिक स्वरात गायलेल्या पाळणा गीतांनी शहरात सर्वत्र माघी गणेशजन्म सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासूनच सनईच्या सुरावटीने गणेश देवतेला अभ्यंगस्नान, महादुग्धाभिषेक करण्यात आले. यानंतर दुपारी बारा वाजता भगवंताचा जन्म सोहळा पुष्पवर्षावाने तसेच विविध पाळणा गीतांनी साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात गणेशाला विराजमान करण्यात आले व पाळणाआरती करून गणेशाचा सर्वत्र जयजयकार करण्यात आला.
माघातील गणेश जयंती
नरांतक या राक्षसाला ठार करण्याकरिता कश्यपाच्या पोटी गणपतीने विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव म्हणून साजरी केली जाते. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते.
या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.
त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.