ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. सोमवारी (17 जुलै ) संध्याकाळी नागपुरातील शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. येथील चौथ्या मजल्यावर उमेश यादवचं घर आहे. घरात कुणीही नाही याची संधी साधून चोरांनी जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे चोरीची घटना घडली त्यावेळी उमेश यादव नागपुरातच होता. पण यावेळी कुटुंबीयांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली.
तर दुसरीकडे, भारतीय क्रिकेट टीममधीलच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करण्यात आली असून त्याला घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मोहम्मद शमीनं कोलकातामध्ये चार जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, चार जणांनी शिवीगाळ केली आणि बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप शमीनं केला. याबाबत त्यानं पोलिसात तक्रारही नोंदवली. घडल्या प्रकाराबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं एका व्यक्तीची ओळख पटवून अन्य तीन जणांनाही ताब्यात घेतले. यातील तीन जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
शमीनं घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी (15 जुलै ) रात्री कार पार्किंगदरम्यान एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. यावरुन संबंधित व्यक्तीनं शमीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यानं शमीला अशीही धमकी दिली की, जर गाडीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केलास तर तुला (शमीला) धडा शिकवेन.
दरम्यान, या घटनेनंतर शमीनं त्याच्यासोबत कुटुंबालाही पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
https://www.dailymotion.com/video/x8458d7