ऑनलाइन लोकमत
मुंबई/नाशिक/ अहमदनगर, दि. 5 - शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. आज राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहेत.
नाशिक येथे रविवारी झालेल्या किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. बैठकीला ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, डॉ. अजित नवले, राजू देसले, चंद्रकांत बनकर, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पुणतांबा गावातील ग्रामस्थांनीदेखील एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे़ कोअर कमिटीला बाजूला ठेवून संपाची सूत्रे नामदेव धनवटे, डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चहाण, विजय धनवटे यांनी हाती घेतली आहेत. कुणा एका व्यक्तीकडे संपाचे नेतृत्व न सोपविता गावासह जिल्ह्यातील इतर शेतकरी एकत्रित संपाची दिशा ठरवतील, असा निर्णय रविवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
बंदला सुरुवात -
ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाची ठिणगी पडली, त्या पुणतांबाकरांनी संपाला जोरदार पाठिंबा दिला असून आज सकाळपासून पुणतांबा बंद आहे. पुण्यात कात्रज सहकारी दूध संघाचं संकलन स्थानिक पातळीवर होत असलं तरी डेअरीपर्यंत वाहतूक बंद आहे. मनमाड, मालेगाव, चांदवडमध्ये महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एसटी बस थांबवावी असा आदेश एसटी चालक वाहकांना देण्यात आला आहे.. परिस्थितीचं गांभीर्य पाहून तात्काळ पोलिसांना तसंच वरिष्ठांना माहिती द्यावी असंही आदेशात म्हटलं आहे.
कोल्हापुरात महाराष्ट्र बंदमुळे आज सकाळी आणि संध्याकाळी होणारं गोकुळ दूध संघाचं संकलन बंद राहणार आहे. गोकूळ दूध संघात दररोज 11 लाख लिटर दुधाचं संकलन होत असतं.
महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना (रघुनाथदादा) सिटू, किसान सभा, छावा आदी पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग देताना सर्वांना दिला दिला जातो. त्यात शिपाई, लिपिक, अधिकारी असा भेदाभेद केला जात नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असा भेदाभेद का? शेतकरी जितका मोठा तितका त्यांच्यावर कर्जाचा डोंगर मोठा आहे. काही भागांत अधिक जमीन असणारे शेतकरी नापिकीमुळे कर्जबाजारी आहेत. तर काहींचे खाते विलगीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती का नको. त्यामुळे अल्पभूधारक, भूधारक असा भेद न करता सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेतला जाणार नाही, असे ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.
आठवडे बाजार उठविले
संपाच्या चौथ्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आले. शहरांकडे जाणारे दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रविवारी भरणारे सर्व आठवडेबाजार उठवले गेले. इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर दूध, फळे, कांदे फेकत संताप व्यक्त केला.
बंदला शिवसेनेचा पाठिंबा
शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्ते खासदार विनायक राऊत यांनी दिली.
https://www.dailymotion.com/video/x8451pg