वर्धा - नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा-यवतमाळ बायपास मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक व क्लिनरने वेळीच कंटेनर सोडल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भागीचा भडका जसजसा उडत होता. तसतसा त्यातील कारच्या टायरचा स्फोट होत होता. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ उठत असल्यामुळे ते निष्फळ ठरले. आग विझवतपर्यंत कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून राख झाल्या होत्या. यावेळी बघ्याची तोबा गर्दी झाली होती.
चेन्नई येथून ह्युंदाई कंपनीच्या नऊ नवीन कार घेऊन कंटेनर क्र. एचआर ५५ एम ०९४८ हा छत्तीसगड राज्यातील कोरबा येथे वर्धा मार्गे जात होता. वर्धा बायपासवर येताच खड्ड्यांमुळे कंटेनरच्या कॅबीनमधील बॅटरीचे वायर शॉट झाले. वायरिंग पेटत असल्याची बाब चालक अवधेशकुमार पाल (२५) व क्लिनर सोनू पाल (१८) दोघेही रा. अलाहाबाद यांच्या लक्षात आली. आग भडकत असल्याचे बघून त्यांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला आणि त्यातून उडी घेऊन बाहेर पडले. क्षणार्धात आगीने कॅबीनचा ताबा घेतला. पाठोपाठ समोरचे टायरही आगीने कवेत घेतले. बघता बघता संपूर्ण कंटेनरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. टायर, डिझेल टँकसह ब्रेक आॅईल जळत असल्याने आगीची तीव्रता वाढतच गेली. यानंतर कंटेनरमधील नव्या कोऱ्या कारनेही पेट घेतला. वर्धा नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल होईपर्यंत निम्मेअधिक कंटेनर जळाले होते. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न केला. कंटेनरच्या पूढच्या भागातील आग विझली; पण कंटेनरमधील कार जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. कंटेनरचे दार उघडताच आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. अखेर संपूर्ण कंटेनर आणि त्यातील नऊ कार जळून खाक झाल्या. यात सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. दोन्ही बाजूची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
बघ्यांची तोबा गर्दी-
दी बर्निंग कंटेनर पाहण्याकरिता परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी पोलीस व अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली, तर काही केवळ दृश्य व व्हिडीओ टिपण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले.
दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा-
या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा बायपास मार्गावर सावंगी टी पॉर्इंटपासून तर दत्तपूर चौकापर्यंत अशा सुमारे तीन कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे जडवाहतुक वर्धा शहरातून वळती करण्यात आली होती.