ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 29 - जिल्ह्यात सुरू असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक पठाणी वसुलीचा निषेध नोंदविण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात गुरुवारी २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. स्थानिक अशोक वाटिका येथे झालेल्या स्त्री मुक्ती दिनाच्या कार्यक्रमातून अवचार यांनी ही घोषणा केली होती. त्यानुसार निघालेल्या या मोर्चात महिलांची उपस्थितीत लक्षणीय होती. अकोला जिल्ह्यात मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी अभिकर्ता यांच्याकडून शोषण करीत आहे. नियमबाह्य हे अभिकर्ता रात्री-बेरात्री महिलांना छळतात. वसुलीसाठी घरातील वस्तूंची लूट केली जाते. अनेकदा धमक्या देऊन साहित्य पळविल्या जाते. पातूर आणि बाभुळगाव येथील गरीब कुटुंबातील दोघांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झालेला आहे.अकोला जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात २२ मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून २२५ कोटींचे कर्ज वितरित झाले आहे. यापैकी १६४ कोटींचे कर्ज थकीत आहे. ८ नोव्हेंबर १६ पासून हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्याने मायक्रो फायनान्सची वसुली मंदावली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सक्तीची पठाणी वसुली सुरू झाल्याने मायक्रो फायनान्स कंपन्या प्रकाशझोतात आल्या. अकोला जिल्ह्यात असे १३० कर्मचारी आणि अभिकर्ता कार्यरत असून १६४ कोटींच्या वसुलीसाठी आता पठाणी वसुली केली जात आहे. दरम्यान, पठाणी वसुलीवर लवकरच नियंत्रण लावल्या जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेतून मायक्रो फायनान्स इन्स्टिट्युट नेटवर्कचे सदस्य सुशीलकुमार, राहुलकुमार सिंह, जयप्रकाश के.के. यांनी दिली होती; मात्र त्याचा काही एक परिणाम न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जदार महिलांचा मोर्चा निघाला.
https://www.dailymotion.com/video/x844mu5