विवेक चांदूरकर
बुलडाणा , दि. ३ - मुकम करोती वाचालम, पंगूम लंघयते गिरीम अंध: पश्यति सौंदर्यम
या उक्ती सार्थ ठरवित सामान्य मुलांपेक्षा आम्ही यत्किंचितही कमी नसल्याचे येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेतील अंध, अपंग व मुकबधीर मुलांनी गणेश मूर्ती बनवून सिद्ध केले आहे. अंध, अपंग व मुकबधीर मुलांनी आकर्षक अशा गणेश मूर्ती बनविल्या आहेत.
येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेत अस्थिव्यंग, मूकबधीर व अंध निवासी असे तीन विद्यालय आहेत. या ठिकाणी अंध, अपंग व मुकबधीर अशी २७० मुले शिक्षण घेतात. संस्थेला केवळ १२० मुलांना शिक्षण देण्याचा परवाना असला तरी संस्थेत १७० अतिरिक्त मुलांनाही शिक्षण दिल्या जाते. शिक्षण घेण्यासोबतच ही मुले गायन करणे, विविध संगीत वाद्य वाजविणे, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासोबतच समाजोपयोगी वस्तूही बनवितात. यामध्ये पायदान, टाकावू लग्न पत्रिकांपासून ग्रिटींग्ज बनविण्यात येतात. सध्या गणेश उत्सव एका आठवड्यावर येवून ठेपला असून, सर्वत्रच या उत्सवाची तयारी
करण्यात येत आहे. यामध्ये अंध, अपंग मुलेही मागे नसून, त्यांनी गणेशाच्या मूर्ती बनविल्या आहेत. अंध, मुकबधीर व अपंग मुले या मूर्ती बनवितात.
कोणत्या मुलांनी कशाप्रकारे मूर्ती बनवायची याची आखणी करण्यात आली आहे. अंध मुले मातीत पाणी मिसळून मिश्रण तयार करतात. त्यानंतर सदर मिश्रण मुकबधीर मुले साच्यामध्ये टाकतात. साच्यातून बाहेर काढल्यावर मूर्तीला अंतिम रूप देण्याचे काम अपंग मुले करतात. अशाप्रकारे अंध, अपंग व मुकबधीर मुले मिळून सुंदर अशा गणेश मूर्ती तयार करतात. गत सहा ते सात वर्षांपासून विद्यार्थी अशाप्रकारे दरवर्षी शेकडो मूर्ती तयार करतात.
मूर्ती दिल्या जातात भेट
अंध व अपंग मुलांनी बनविलेल्या मूर्ती संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील तसेच अकोला, वाशिम, अमरावती, जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांना भेट दिल्या जातात. मुलांनी बनविलेल्या मूर्तींचे दरवर्षी प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात शेकडो नागरिक सहभागी होवून मुलांचे कौतूक करतात.