ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 12 - कपडे जुने झाले, फाटले की आपण फेकून देतो. तसेच अनेकांच्या दृष्टिकोनात हे जुनाट कपडे निरूपयोगीच असतात. परंतु या जुने, फाटलेल्या कपड्यांची खरी किंमत ओळखली ती उत्तर प्रदेशातील रामपूर येथून अकोल्यात आलेल्या अब्दुल अजीज अन्सारी यांनी. जुने कपडे, फाटलेल्या कपड्यांचा वापर करून त्यांनी सतरंजी, चादर, बेडशीट आणि आसनपट्टी निर्मितीचा व्यवसाय थाटला आहे.
नागरिकांकडून किलोप्रमाणे जुने कपडे घेऊन त्यांना स्वस्तामध्ये चादर, सतरंजी बनवून देतात. अब्दुल अजीज हे त्यांचा मुलगा नईम अहमद याला घेऊन तीन महिन्यांपूर्वी अकोल्यात आलेत. त्यांच्याकडे हॅन्डलूम मशिन आहे. अब्दुलभाई हे अशिक्षित आहेत. हॅन्डलूम मशिनने चादरी, सतरंजी बनविण्याचा त्यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. अब्दुलभार्इंची पाचवी पिढी या व्यवसायात आहे. अकोल्यातील तापडिया नगर आणि गोरक्षण रोडवर अब्दुलभार्इंनी व्यवसाय थाटला आहे. जुने कपड्यांचाही उपयोग होऊ शकतो. हे त्यांनी अकोलेकरांना पटवून दिले. तुमच्याकडील जूने कपडे मला द्या. त्या कपड्यांपासून बनविलेली चादर, सतरंजी, बेडशीट घेऊन जा, असा सल्ला अब्दुलभाई देतात. अब्दुलभार्इंना जुने कपडे दिल्यावर ते कपड्यांचे छोटे छोटे तुकडे करतात. ते तुकडे हॅन्डलूम मशिनमध्ये एक एक करून बसवून, सतरंजी, चादर, बेडशीटसारखे उपयोगी आणि दैनंदिन वापरात महत्वाचे साधन उपलब्ध करून देतात. जुने कपडे दिल्यावर ते केवळ मजुरी घेतात. एक सतरंजी बनविण्यासाठी अर्धा किलो ते चार किलोपर्यंतची जूने कपडे लागतात. यामध्ये शर्ट, पॅन्ट, साडी, पंजाबी ड्रेस, कुर्ता, पायजामासारखे जुने कपडे वापरल्या जातात. त्यांच्याकडे १२५ ते ४५0 रूपयांमध्ये ते साईजनुसार सतरंजी, चादर, बेडशीट आणि आसनपट्टी बनवून देतात.
त्यांच्या या व्यवसायाला अकोलेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुने व फाटलेले, मळलेले कपडेही उपयोगात येतात. याची जाण आता अकोलेकरांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे घरातील आता महिला जुने, फाटलेले कपडे फेकून न देता, थेट अब्दुलभार्इंकडे घेऊ येतात आणि जुने कपडे देऊन नवीन सतरंजी घेऊन जातात.