ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 25 : सात दशकांपेक्षा अधीक वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. दोन वर्षांपूर्वी थेट आखाती देशात व दक्षीण अफ्रिकेत येथील मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. यंदा देखील गुजरात, मध्यप्रदेश राज्यात मूर्ती पाठविल्या जात आहेत. दीडशेप्रकारच्या एक इंचापासून ते २० फूटापर्यंतच्या हजारो मूर्ती गणेशोत्सवासाठी आकारास आल्या आहेत.
नंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे ३० ते ३५ कारखाने आहेत. जून महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात तीन ते चार महिने राबत असतात. पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागिर होते. त्यांच्या हाताच्या कलेने येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. काहीजणांनी मोठ्या मूर्तीकारागिराकडे शिकून स्वत:चा कारखाना सुरू केला तर काही व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत.
शहरातील गल्लोगल्ली असलेले कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणाऱ्या मूर्र्तींची संख्या २५ हजारांपेक्षा अधीक जाते. त्यातून तीन महिन्यात करोडोंची उलाढाल होत असते. नंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यातील मंडळे दोन ते तीन महिने आधीच मूर्ती बुकींग करतात. शिवाय त्यांना जशी मूर्ती लागेल तशी ते बनवून देखील घेतात. गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणाऱ्या मूर्र्तींचे प्रमाण अधीक असल्याचे मूर्ती कारागिर नारायण वाघ यांनी सांगितले.
घरगुती उद्योगही...नंदुरबारात मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे घरगुती उद्योग देखील आहेत. जुन्या नंदुरबारातील घराघरांमध्ये महिला, मुले मूर्ती तयार करतात. अगदी एका इंचापासून येथे मूर्ती तयार करण्याची कला अवगत आहे. सध्या शाडूच्या मूर्र्तींना चांगली मागणी असल्यामुळे शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करणारे देखील अनेकजण तयार झाले आहेत. काही परिवार वर्षानुवर्ष केवळ शास्त्रोक्त पद्धतीनेच मूर्ती साकारत आहेत. अर्थात शास्त्रात मूर्ती साकारण्याचे जे नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत त्यानुसारच ते मूर्ती तयार करतात. त्यात ते कोणतीही तडजोड करीत नाहीत.