सोमनाथ खताळ / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 29 -पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराला ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या शहरामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. ठराविक पर्यटन स्थळ सोडले तर इतर स्थळी पर्यटकांचा ओढा कमी असतो. शहरातील बहुतांश पर्यटनस्थळे हे दुर्लक्षित आहेत. अशा दुर्लक्षित पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे सोनेरी महल. शैक्षणिक चळवळींनी गाजलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या निसर्गरम्य परिसरात आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या या महलाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष आहे. अपेक्षेप्रमाणे पर्यटकांना सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने येथे उपाययोजना नसल्यामुळेच येथे पर्यटक कमी येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नाव सोनेरी असलेला हा महाल संबंधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे ‘ओसाड’ झाला आहे.सोनेरी महाल ही ऐतिहासीक वास्तू सातारा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. या महलापासून मिनी ताजमहाल म्हणून परिचित असलेला बीबी-का-मकबरा अवघ्या अर्धा कि़मी.च्या अंतरावर आहे. पाठीमागे लहान पर्वतरांगा असलेली सोनेरी महालाची आयताकृती इमारत एखाद्या चित्राप्रमाणे भासते. भोवताली असलेली झाडे व कुरणे (जी सध्या वाळलेली आहेत. त्यामुळे परिसर उजाड वाटतो) इमारतीच्या सौंदर्यात अधिक भर टाकतात.वास्तूच्या अंतरंगातील सोन्याच्या पाण्याने रंगवलेल्या चित्रामुळे या वास्तूला सोनेरी महाल असे नाव प्राप्त झाले.औरंगजेब सोबत दख्खनेत आलेल्या बुंदेलखंडातील सरदारने हा महाल बांधला. काही उपलब्ध पुराव्यांवरून असे कळले की शहाजहानने पहाडसिंग व झुंजारसिंग या दोन भावांना दख्खनेत पाठवले होते. औरंगजेबच्या काळात वेळोवेळी पराक्रम गाजवून पहाडसिंगने मुघल साम्राज्याला आपली निष्ठा दाखवून दिली. पुढील काळात त्याने या महालात वास्तव्य केले. या पुराव्याला अजून एक आधार असा की, सोनेरी महालाच्या बाहेर पहाडसिंगचा सावत्र भाऊ लाला हरदौलचे स्मृती स्मारक आहे. पहाडसिंगचा मृत्यू १६५३ साली झाला. यावरून सोनेरी महाल १६५१ ते १६५३ सालाच्या दरम्यान बांधला गेला असावा, असा तर्क करण्यात येत आहे. ही इमार बांधण्यासाठी ५० हजार रूपये खर्च आला होता. १९३४ साली मुळ किंमतीचा अंदाज घेऊन हैदराबाद संस्थानच्या तत्कालीन निजामाने हा महाल ओरछाच्या सवाई महेंद्र विरसिंहदेव बहादूर कडून २६ हजार ४०० रूपयांना विकत घेतला.सोनेरी महालचे प्रवेशद्वार (हाथीखाना) एक प्रभावी वास्तू असून त्याला कमानीयुक्त सुरक्षा भिंत आहे. हाथीखान्याचे बांधकाम भव्य व आयताकृती असून त्यात असलेल्या निमुळत्या कमानी त्याच्या सौंदर्यात भर घालतात. याच हाथीखान्यातून मुख्य महालाकडे एक मार्ग जातो. ज्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूस बाग आहे. या रस्त्याच्या मधोमध असलेले लंबाकार जलाशय २००१-०२ साली जतन कर्त्यांनी मुघल स्थापत्यशास्त्राचा वारसा जपण्याच्या हेतून बांधले.सोनेरी महालाची वास्तू आयताकृती आणि दुमजली असून एका चौथºयावर आहे.खालच्या मजल्यावर एक स्तंबबद्ध दालन, चार खोल्या आणि दोन अरूंद दादरे आहेत. दुसºया मजल्यावर एक दालन असून त्याच्या चार कोपºयात चार खोल्या आहेत. सर्वात वर गच्ची असून त्यावर पाहणीचा मनोर आहे. सोनेरी महाल ही वास्तू महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६२ यानुसार राज्यंसरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर असलेले प्रादेशिक वस्तूसंग्रहहालय १९७९ साली स्थापन करण्यात आले. या वास्तूसंग्रहालयात पुरातन कलावस्तूंचा संग्रह नऊ दालनांमध्ये प्रदर्शित केला आहे. यात प्राचीन मूर्ती, चित्रे, दागिणे, मृदभांडी शस्त्रे यासारख्या वस्तूंचा समावेश असून तेर उत्खननात सापडलेल्या भाजलेल्या मातीच्या कलावस्तू लाकडावर रेखाटलेली चित्र, मराठवाड्याच्या विविध भागातून मिळालेली दगडी शिल्पे इ. विशेष उल्लेखनीय आहेत. हे संग्रहालय सोमवार व्यतीरिक्त १०.३० ते ५ या वेळेत खुले असते. तसेच हे स्मारक सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत रोज उघडे असते. (संदर्भ-महालातील माहिती फलक)याबरोबरच या महालात सुमारे अकराशे ऐतिहासीक वस्तू आहेत. त्यामध्ये १९ व्या शतकातील काचेवरील चित्रे, ऐतिहासिक भांडी, सोन्याचा मुलामा दिलेले पेंटिंग, सातवाहन काळातील वस्तू, विविध अलंकार वेशभुषा अशा साहित्याचा समावेश आहे. त्याचबरोबर मूर्तिशिल्पांमध्ये १२ व्या शतकातील ब्रह्मदेव, १२ व्या व १३ व्या शतकातील सातवाहन मूर्ती, १८ व्या शतकातील काष्ठशिल्प, शिलालेख, पितळी ताम्रपट त्याचबरोबर विविध देवतांच्या पुरातन मूतीर्ही आहेत. पुरातन काळातील शस्त्रे, तोफा यांचाही समावेश या संग्रहालयात आहे.यावर्षी झाला महोत्सव -मागील काही वर्षांपासून येथे आयोजित केल्या जाणाºया औरंगाबाद वेरूळ महोत्सवाला ग्रहन लागले होते. त्यामुळे इकडे येणाºया पर्यटकांची संख्या रोडावली होती. यावर्षी हा महोत्सव झाल्याने पुन्हा येथे गर्दी वाढली. परंतु ही गर्दी केवळ या महोत्सवापुरतीच राहिली. त्यानंतर मात्र पुन्हा या पर्यटनस्थळाकाडे पर्यटकांनी दुर्लक्ष केले. ऐतिहासीक राजवाडा म्हणून परिचय-विद्यापीठ परिसरातील हा सोनेरी महाल ऐतिहासिक राजवाडा म्हणून परिचीत आहे. सध्या या महलाचा उपयोग ग्रंथालय व ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आला आहे. याच परिसरात वेरुळ-औरंगाबाद महोत्सव आयोजित केला जातो.परिसर उजाड-कधीकाळी हा परिसर निसर्गरम्य म्हणून परिचीत होता. परंतु सततचा दुष्काळ आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हा परिसर उजाड झाला आहे. महालाताली कुरण वाळून गेले आहे. तसेच परिसरातील झाडेही वाळलेली पहावयास मिळतात. पावसाळ्यातील काही दिवस मात्र हा परिसर सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसते.सुविधांची वाणवा-या महालाकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही. तसेच येथे येणाºया पर्यटकांसाठी बसण्यासाठी कुठलीही सोय नाही. विशेष म्हणजे साधी पाण्याचीही सोय नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून येथे उपाययोजना नसल्याचे दिसते. याचा फटका पर्यटनस्थळाला बसत आहे. येथे सुविधा पुरविल्यास पर्यटकांचा ओढा वाढेल, असा विश्वास इतीहासकारांनी व्यक्त केला आहे.
https://www.dailymotion.com/video/x844q50