ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 17 - येथील चाळीसगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कैलास शेलार यांनी आपल्या पाळलेल्या गायीचा डोहाळे कार्यक्रम थाटात केला. यानिमित्त १७ रोजी गोमाता ओटीपूजनासह भोजन समारंभही उत्साहात पार पडला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास परिसरातील शेकडो आबालवृध्द व महिलांनी हजेरी लावली. परिसरात चर्चेचा विषय ठरलेल्या या कार्यक्रमाबाबत आयोजक शेलार यांनी सांगितले की, ही गाय घेतल्यापासून आमची आर्थिक परिस्थिती खूपच सुधारली. सुख-शांतीही वृध्दींगत झाली. गाय खिल्लारी असूनही खूप गरीब आहे. घरातील सर्वांचा तसेच वाहनांचा आवाज ऐकून प्रतिसाद देते. यामुळेच घरातील सदस्य समजून डोहाळे कार्यक्रम आम्ही आयोजित केला. या कार्यक्रमात एखाद्या स्त्रीचा डोहाळे कार्यक्रम करावा त्या पध्दतीने सर्व सोपस्कार करण्यात आले. भरजरी झूल व ११०० रु.चा हिरवा शालू पूजनाच्या वेळी गायीस घालण्यात आला होता. गावातील अनेक स्त्रियांची गायीची ओटी भरुन औक्षण केले. दोन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. त्यात कैलास पुंजू शेलार व सुनीता कैलास शेलार व समस्त शेलार परिवारातर्फे उपस्थितीची विनंती करण्यात आली होती. (वार्ताहर)
https://www.dailymotion.com/video/x844oju