ऑनलाइन लोकमत/ भावना बाटीया
पुणे, दि. 18 - एरव्ही सिग्नला फाटलेले मळके कपडे घालून केविलवाणा चेहरा करत फुले, खेळणी घेण्यासाठी अनेक लहान मुले विनवणी करताना दिसतात. त्यांना पाहताच सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजते. काय करत असतील ही मुल? यांच्या शिक्षणांच काय? या मुलांच निरागस बालपण सिग्लजवळ चुरगळल जातं का? यासारखे असंख्य प्रश्न त्या तीस सेंकदाच्या सिग्नलला पडतात, पण काही क्षणात सिग्नल सुटतो आणि ते प्रश्नांचं काहूर ही थांबते. पण अशाच शिक्षणापासून वंचित मुलांसाठी पुण्यातील एक आगळी-वेगळी बिना भितींची ग्रीन सिग्नल शाळा सुरु झाली आहे.
अजित फांउडेशन व रोशनी या संस्थेमार्फत डेक्कन जिमखानाच्या मागील बाजुस असलेल्या झेड ब्रिज खाली भरते. या झेड ब्रिजखाली गेली अनेक वर्ष बार्शी, गुलर्बगा, विजापुर या परिसरातील पारधी समाजातील कुटुंबे येथे वास्तव्यास आहे. फुले विकणे, खेळणी विकणे आणि तरीही भागले नाही तर नाईलाजाने भिक मागणे अशी कामे करतात.
या समाजातील मुले गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणांपासून वंचित असल्याचे अजित फाऊंडेशनचे महेश निंबाळकर यांनी सांगितले. या परिसरात २५-३० कुटुंबे राहतात. सुरवातीला आम्ही हा प्रकल्प सुरु केला तेव्हा आम्हाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पालकांना लहान मुलांकडून चांगले उत्पन मिळत असल्यामुळे त्यांना शिक्षणांचे तितकेसे महत्व वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आम्ही येथे येऊन मुलांना गोळा करुन त्यांच्या आवडीचे खेळ खेळायला लावायचो. त्यांनी खाऊ वाटप करायचो. त्यामुळे हळू-हळू मुले जमू लागली. अशा प्रकारे आमच्या ग्रीन सिग्नल शाळेला सुरुवात झाली.
रोशनी संस्थेची दिक्षा दिंडे म्हणाले, ‘आम्ही खाऊ वाटप करतो या आशेने अनेक मुलं जमतात हे आमच्या लक्षात आले. यातील फार कमी मुलांना काही नवीन शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही खाऊ वाटप करणे बंद केले. याचा परिणाम असा झाला की मोजकी पण नवीन शिकण्याची इच्छा असलेली मुलं आम्हाला मिळाली.’
दिक्षा दिंडे, महेश निंबाळकर, मृण्मई कोळपे, विनया देशपांडे यांच्याबरोबर अनेक स्वंयसेवक या मुलांना रोज सांयकाळी ४ ते ६ वेळेत मुलांना शिकवितात. या शाळेला पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून खास परवागी घेण्यात आली आहे. या शाळेत मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित शिक्षण ही देण्यात येणार आहे. या बरोबरच हसत-खेळत शिक्षण, ज्ञानरचनावाद यासारखे विविध प्रयोग करुन मुलांना शिक्षणांच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या ग्रीन सिग्नल शाळेमार्फत केला जाणार आहे.
रोशनी व अजित फाऊंडेशन मार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले होतो. या मध्ये वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील सुमारे ८८ मुले असून डेक्कन परिसरात भिक मागणे, फुलं, खेळणी विकणे अशी कामे करतात. रस्तावरच जगण, व्यसनाधीन वडिल, सतत शिव्या देणारी आई व लहान वयात पैसे कमविण्याची सवय या सर्व गोंधळात या लहान मुलांचे निरागसपण हरवून गेले आहे. जेव्हा ही मुल या शाळेत येतात तेव्हा मात्र त्यांचे आजुबाजुचे विश्व काही काळ बदलुन जाते. ही मुले मनमोकळ हसतात, छान-छान बडबड गीतांवर, गाण्यावर ताल धरतात.