राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"नासक्या भाजीबद्दल काय बोलावं?" असं म्हणत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. तसेच "आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही. आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत" असं म्हटलं आहे.
"कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय" अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipanrao Bhumre) यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार झालो नाही तर आमच्यामुळे ते खासदार झाले. राऊत आता उरलेली शिवसेना देखील संपवणार आहे. यांच्यामुळेच बंड झालं. या सर्व प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहे" अशी जोरदार टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे.
"संजय राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिल्लक असलेले अनेक जण आमच्या संपर्कात"
शिवसेनेत सध्या जे लोक शिल्लक आहेत. त्यातील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा देखील भूमरे यांनी केला आहे. "पंधरा दिवसांनंतर आम्ही आता घरी आलो आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो. आम्ही पैसा किंवा कोणत्या पदाच्या लालसेने गेलेलो नव्हतो. पैशांनी मी आयुष्यात कधीही महत्त्व दिलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक आम्हाला भेटू देत नव्हते. त्यामुळे आमचं काम होतं नव्हतं" असं म्हटलं आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला अडचणीत आणत होती. त्यामुळे आम्हाला हे बंड करावं लागलं. उद्धव ठाकरे हे आता रोज बैठका घेतात. सेनाभवनला जातात. त्यांनी हेच जर आधीच केलं असतं. तर आम्हाला भेट दिली असती, आमचे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती" असं देखील संदिपान भूमरे यांनी म्हटलं आहे. ते पंधरा दिवसांनंतर आपल्या घरी आले आहेत. TV9 मराठी या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.