बारामती : भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. एकीकडे गावातील वातावरण अगदी घरातील कुणी तरी गमावल्याच्या भावनेने शोकाकुल होते. तर दुसरीकडे मात्र कुटुंब,गाव, राष्ट्र आणि देशाचे नाव रोशन केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाचा उर अभिमानाने उंचावत होता. हे वातावरण होतं बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावचे. देश कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या सुपुत्रास जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आले.
कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील जवान बिंटू राजाराम सुळ यांना जम्मू काश्मीर येथे मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) कर्त्यव्य बाजावत असताना वीरमरण आले. शनिवारी (दि. २) बिंटू सुळ यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कोऱ्हाळे येथे आणण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येनी ग्रामस्थ उपस्थित होते.अत्यंत शोकाकुल वातावरणात सुळ यांची अंत्ययात्रा निघाली होती.यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भारत माता की जय, जवान बिंटु सूळ अमर रहे, वंदे मातरम च्या घोषणा दिल्या. गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी भारत मातेच्या या सुपुत्रास निरोप दिला.
जवान बिंटु सूळ यांच्यामागे त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे. सैन्यदलामध्ये त्यांची १४ वर्षांची सेवा पूर्ण झालीहोती. त्यानंतर पुन्हा त्यांनी सेवा वाढवून घेतली होती.