अझहर शेख / आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. 21 - ‘ईद’ हा अरबी भाषेतील शब्द त्याचा अर्थ आनंद (खुशी) असा होतो. मुस्लीम बांधव इस्लामी कालगनणेतील नववा महिना ‘रमजानुल मुबारक’मध्ये निर्जळी उपवास करतात. या महिन्याची सांगता रमजान ईद सणाने केली जाते. या सणालाच अरबीमध्ये ‘ईद-ऊल-फित्र’ असे म्हटले जाते. या सणाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे ईदचे सामुहिक नमाजपठण. या नमाजपठणाची मुख्य पारंपरिक जागा म्हणजे गावाच्या वेशीवरील ‘ईदगाह मैदान’. पैगंबरांच्या शिकवणीनुसार गावाच्या बाहेर वेशीलगत खुल्या आकाशाखाली मोकळ्या पटांगणात रमजान ईद, व बकरी ईदचे नमाजपठण करण्याची प्रथा आजही सर्वत्र पाळली जाते. नाशिकमध्ये त्र्यंबकरस्त्यावर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून ईदगाह मैदान उपलब्ध आहे. या मैदानात ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाहची मुघलकालीन वास्तू लक्ष वेधून घेते. या वास्तूचे वैशिष्ट म्हणजे सुमारे सातशे ते आठशे वर्षे जूनी दगडी बांधकाम असलेली व मुघलकालीन स्थापत्यक लेचा नमुना आहे. जास्त लांबी-रुंदीच्या भिंतीच्या स्वरुपात असलेल्या या वास्तूचे गोलाकार दोन्ही बाजूला असलेले बुरूच व मध्यभागी असलेले दोन मनोरे आकर्षक ठरतात. यामुळे वास्तूचे सौंदर्य अधिकच खुलते.
मुहम्मद तुघलकाच्या आगोदर इगतपुरी येथे आलेले हजरत सय्यद सद्रोद्दीन हे सुफी संत आणि हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी यांनी ईदगाहची निर्मिती केली असल्याचे जुणे जाणकार व मुस्लीम समाजाचे धार्मिक नेते हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी सांगतात. ईदगाहच्या वास्तूची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर काही महिन्यांनी नाशिकमध्ये तत्कालीन गुलशनाबादेत मुघल राजा शहाजहांन आपल्या सैन्यासह दाखल झाला. त्यावेळी सुफी संत हुसेनी बाबा आणि शहाजहांन यांची भेट झाली. दरम्यान, त्याचे सैन्य ईदगाह मैदानावर विश्रांतीसाठी थांबलेले होते, असे सांगितले जाते. त्या काळात त्याने इदगाहच्या वास्तूचे नुतनीकरण करत मुघल स्थापत्यकलेनुसार त्याचे बांधकाम केल्याने हा ईदगाह पुढे ‘शहाजहांनी’ नावाने ओळखला जाऊ लागला.या ईदगाह मैदानावर वर्षभरातून दोन वेळा नाशिकमधील मुस्लीम समुदाय नमाजपठणासाठी एकत्र येतो. रमजान ईद व बकरी ईदच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडणाऱ्या सामुहिक नमाजपठणाचा सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो. यावेळी शहर-ए-खतीब पदवी असलेले हाजी हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून मुस्लीम समुदाय या ठिकाणी नमाजपठण करीत आहेत. त्या आगोदर त्यांचे वडील खतीब मुनिरोद्दीन यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून हिसामुद्दीन यांनी त्यांच्या निधनानंतर जबाबदारी सांभाळली आहे.
सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिक या मैदानात यावेळी जमलेले असतात. काळानुरूप मैदानाची क्षमता वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे कमी पडू लागली आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी दोन वेळा महानगरपालिकेच्या वतीने मैदानाचे सपाटीकरण केले जाते तसचे शुचिर्भूत होण्यासाठी नागरिकांकरिता दोन्ही प्रवेशद्वारांवर तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचे नळही बसविले जातात. हा अगळावेगळा सोहळा नागरिकांसाठी एक वेगळीच अनुभूती देणारा ठरतो. सोहळ्यानंतर शहरातील मान्यवर गुलबपुष्प देत अलिंगन देऊन शुभेच्छा देतात. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ईदगाहवर सहज घडते. येत्या सोमवारी (दि.२६) साजरी होणाऱ्या रमजान ईदनिमित्त शहाजहांनी ईदगाह सज्ज झाला असून ईदगाह समितीकडून आकर्षक रंगरंगोटी वास्तूला करण्यात आल्याने सौंदर्य अधिकच वाढले आहे.
https://www.dailymotion.com/video/x84563e