ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - नायक चित्रपटाच ज्याप्रमाणे अनिल कपूरला एक दिवसासाठी मुख्यमंत्री करतात तसंच मलाही मुख्यमंत्री कराल का ? असा प्रश्न आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी विचारला असता एक दिवस तुम्ही अनेक दिवसाचे मुख्यमंत्री व्हाल अशी अपेक्षा करतो असं मिश्किल उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. पहिल्यांदाच रामदास आठवले यांनी घेतलेल्या या मुलाखतीत आपल्या कवितांनी मुख्यमंत्री आणि प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री यांना आपल्या कविता ऐकवत अनेक प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनीही दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. उद्धव ठाकरे आणि तुमची चांगली मैत्री असताना का बिनसलं ? असा प्रश्न रामदास आठवले यांनी विचारला असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, "आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. आमची मैत्री चांगली आहे. निवडणुकीवेळी अशी काही परिस्थिती येते त्यामुळे वाघबाण चालतात. राजकारणात आपले विरोधक असतात पण त्यांना शत्रू करु नये असे माझे संस्कार शिकवतात. आमच्यात सर्व काही ठीक आहे", असं उत्तर दिलं.
दिल्लीला बोलावलं तर कोणाला मुख्यमंत्री बनवणार ? असं विचारलं असता तुम्हाला बनवू असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकलं. राजकारणावरुन बाहेर जात रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना अमृता फडणवीस यांना कधी थाप मारली आहे का ? असा प्रश्न विचारून टाकला. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी "बायकोसमोर मारलेली थाप कधीच पचत नाही, पचली असं सांगत असेल तर तो सर्वात मोठा थापाड्या असतो", असं सांगून टाकलं.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
https://www.dailymotion.com/video/x844vmc