ऑनलाइन लोकमत
भामरागड (गडचिरोली), दि. १२ - पर्लकोटा नदीला रविवारच्या रात्री पूर आल्याने भामरागड जलमय झाले असून आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड गावाला लागून पर्लकोटा नदी असून याच ठिकाणी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या तीन नद्यांचा संगमही आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात भामरागड येथे १७.७ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस भामरागडात असल्याने परिसरातील १०० गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. शनिवारी रात्री आलेला पूर रविवारच्या दुपारी ओसरला. यावेळी नागपूर-भामरागड, गडचिरोली-लाहेरी, अहेरी-भामरागड बसगाड्या रात्री भामरागडात पोहोचल्या होत्या व या बसगाड्या मुक्कामी असताना रविवारच्या रात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झाला व सोमवारी सकाळी पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढले व हा मार्ग बंद झाला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसगाड्या व जवळजवळ २५ ते ३० खासगी वाहने भामरागडात अडकून पडले आहे. हे सर्व वाहने राजे विश्वेश्वरराव चौकात उभे ठेवण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ३ वाजेपर्यंत पर्लकोटाच्या पुलावर दीड ते दोन फूट पाणी होते, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली.