ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - खड्यांशी झुंजत शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आई-वडील उर फुटेस्तोवर काम करत आहेत. मात्र, पोटासाठी भ्रमंती करताना पोटच्या चिमुकल्याच्या आयुष्याला शिक्षणाचा रस्ता दाखविणे अशिक्षितपणामुळे शक्य नाही. शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणण्याच्या निव्वळ मोहीमा राबविल्या जातात. पण सुरेशसारख्या अनेकांची अद्यापही फरफटच होत आहे. मुळचा कर्नाटक राज्यातला सुरेश. गावी असताना पहिलीत शाळेत जायचा. पण आई-बाबा पुण्यात काम करण्यासाठी आल्याने आता शाळेत जाता येत नाही. शहरातील विविध रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे त्याचे पालक करत आहेत. मलाही शाळेत जायचंय! पण कसं जायचं, कोणत्या शाळेत मला प्रवेश मिळेल?,असा प्रश्न सुरेश पवार या लहानशा मुलाला पडला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण देणे बंधनाकर झाले आहे. आरटीई अंतर्गत आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. शालाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले जाते. शालाबाह्य मुलांच्या नोंदणीची मोहिम राबविण्यात आली. परंतु, शासनाचे विविध उपक्रम व योजना कागदावरच आहेत. पुण्यात राज्याच्या शैक्षणिक धोरणाचे आरखडे तयार केले जातात. मात्र, त्याच विद्यानगरीत रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री करणारी लहान मुले फिरताना दिसतात. पोट भरण्यासाठी शहरात रोजगारासाठी आलेल्या कामगारांची मुले विनाकारण दिवसभर त्यांच्या मागे भटकतात. त्यातीलच सुरेश पवार हा एक शालाबाह्य विद्यार्थी आहे. सुरेशचे कुटुंब काही महिन्यांपूर्वी पुण्यात रोजगारासाठी आले. सध्या तो आपल्या कुटुंबाबरोबर विमाननगर येथे राहतो. त्याचे पालक पुणे स्टेशन,हडपसरसारख्या विविध ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचे काम करण्यासाठी जातात. त्यांच्याबरोबर सुरेशलाही फिरावे लागते. त्यामुळे सुरेश सारख्या शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी शासनाकडून कोणतीही जबाबदारी घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच इच्छा असूनही परिसरातील शाळांमधील शिक्षकांना या मुलांना शाळेत दाखल करून घेता येत नाही. त्यामुळे शालाबाह्य मुलांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.वाचन प्रेरणा दिन ठरला सुरेशसाठी सोनेरी स्वप्नांचावाचन प्रेरणा दिना निमित्त शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. मंगळवार पेठेतील आबासाहेब अत्रे दिन प्रशालेच्या वतीने ग्रंथपाल प्रसाद भडसावळे व शिक्षक हरेश पैठकणकर यांनी रस्त्यावरील मुलांना गोष्टीच्या व चित्रांच्या पुस्तकांचे वाटप केले. त्यावेळी सुरेश पवार सारखी अनेक मुले त्यांना रस्त्यावर फिरताना दिसली. त्यांना पुस्तके भेट दिली. या मुलांनाही त्याचे अप्रुप वाटले. छापील अक्षरांतील गमंत जाणवली. त्यांच्या आई-वडीलांनाही मुलांच्या या नव्या खेळण्याचे कौतुक वाटू लागले. त्यामुळे त्यांनीही मुलांना शाळेत जाण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, या मुलांना शासन नियमावलीनुसार शाळेत कसे दाखल करून घ्यायचे असा प्रश्न आहे. शिक्षण विभागाने ह्यसरलह्णचा बाऊ केला आहे .त्यामुळे शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेतले जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा सुरू झाल्यानंतर कोणत्याही दिवशी शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घ्यायला हवे.त्यामुळे अनेक मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत. - हेरंब कुलकर्णी,शिक्षणतज्ज्ञ