राजेश शेगोकार
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २३ - गोकुळाष्टमी म्हणजे सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचा सण. रात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करुन दुस-या दिवशी दहीहंडी खेळली जाते. यानिमित्ताने अनेकजण श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेणं पसंत करतात. यानिमित्ताने जाणून घेऊया अकोल्यातील श्रीकृष्ण मंदिराबद्द्ल. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे माना गावात शेत नांगरतांना ही मूर्ती सापडली असून अदभूत कलाकृर्ती म्हणून या मुर्तीचे विशेष स्थान आहे.
माना गावात श्रीराम व श्रीकृष्ण यांचे एकत्रीत मंदिर आहे. गावखेडयात दिसणा-या मंदिराप्रमाणेच या मंदिराचे बाह्यरूप आहे मात्र आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या दोन्ही मुर्ती पाहिल्यावर अक्षरक्ष: डोळे दिपून जातात. काळया पाषाणातील या दोन्ही मुर्ती इतक्या रेखीव आहेत की जणु काही काही क्षणातच त्या हालचाल करू लागतील असा भास कुणालाही होणे सहाजीक आहे. या दोन्हीमुर्ती मध्ये साम्य म्हणजे माना गावात शेत नांगरतांना या दोन्ही मुर्ती सापडल्या असुन अदभूत कलाकृर्ती म्हणून या मुर्तीचे स्थान आहे. गोकुळाष्टमी निमित्ताने या मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी जमते
मुर्तिजापूर जि. अकोला इथे खोदकाम करताना 3 जुलै १९३२ साली श्री रामाची तर ८ मे १९५२ मध्ये श्री कृष्णाची मुर्ती शेतनांगरतांना मजूरांना सापडली. मुळातच माना हे गाव ऐतिहासक आहे. हे गाव अर्जुन पुत्र बबृवाहन यानी वसविल्याचा उल्लेख हरिविजय या ग्रंथामध्ये आहे. पुरातन काळी हे मीनापुर होते अपभ्रंश होवून माना झाले असे ग्रामस्थ सांगतात. हे गाव किल्यावर वसले असावे तशा खाणाखुणा आजही आहेत रामाची मुर्ती सापडल्यानंतर इंग्रजांनी ती मुर्ती नागपूरला हलविण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी तो हाणुन पाडला व मंदिराची निर्मिती करून प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर विस वर्षानी पुन्हा एकदा शेत नांगरतांना मजूरांना मुर्ती सापडली ती मुर्ती श्रीकृष्णाची होती. या दोन्ही मुर्ती सद्यस्थितीत मंदिरामध्ये विराजमान आहेत या मुर्तींचे सौंदर्य अदभूत अस आहे काळ्या पाषाणात कोरलेल्या मुर्तीत बोटाची नख ,बासरीची दोरी ,कमरेच्या पट्यातील लहान लहान तोडे एवढे नजाकतीने बनविले आहेत ,की हात लावून चाचपडून बघण्याचा मोह होतो. बोटावरच्या रेषा आपल्या ख-या बोटा एवढ्या ठळक दिसतात. या मुर्तीबाबत अकोल्याचे जिल्हा माहिती अधिकारी व ईतिहासाचे अभ्यासक युवराज पाटील यांनी सांगीतले की, भारतात इस पूर्व दोन मध्ये लेण्यातील शिल्पकोरण्याची कला अस्तित्वात आली. त्यानंतर मुर्तीकला अस्तित्वात आली आहे. ही मुर्ती कधी आणि कोणी बसविले हा शोध घेणे खुपच रंजक असले तरी मुर्तीचा काळ हा इ.स.पुर्व दोन मध्ये असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.