Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:23 PM2020-08-09T13:23:04+5:302020-08-09T13:35:52+5:30
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त महिला व बाल विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी काँग्रेसचीही बैठक पार पडली.
सोलापूर, मुंबई : तुमची कामे होत नसतील तर दंगा घाला. बिल्कुल दंगा करा. भीक मागितली तर कोणी देत नाही. आपला अधिकार आहे, हिसकावून घ्या. आम्ही येऊन तालुका सांभाळायचा तर तुम्ही काय सांभाळायचे, असे वादग्रस्त वक्तव्य कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अधिकारी कामे करत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या वक्तव्याची री ओढत सोबत 4-5 पोरं घेऊन जा असे म्हटले आहे.
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात सोलापुरात आले होते. या दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकही घेण्यात आली. यावेळी ठाकूर बोलत होत्या. कोणत्याही तालुकाध्यक्षाने तक्रार करू नये. तुम्ही तुमचा तालुका सांभाळायला पाहिजे. तुम्ही सांभाळा, तुम्हाला ताकद देण्याचे काम आम्ही करू, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले. यानंतर बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर आपलाही धाक असायला हवा. जनतेचा प्रशासनावर धाक हवा. कार्यकर्त्यांनी दोन चार पोरं सोबत घ्या असे वक्तव्य केले आहे.
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीला महिला व बाल विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील १०० दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
''4-5 पोरं घेऊन जा'', अधिकाऱ्यांवर धाक कसा ठेवावा याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्याकडून तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन. @bb_thorat@AdvYashomatiINC@INCMaharashtrapic.twitter.com/SkZUVXfc99
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2020
जिल्हा प्रशासन विविध पातळीवर मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. बाहेर गावी जाणे, लग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा. दंड, लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही, प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. स्वनियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात साबणाने स्वच्छ धुण्यावर भर दिला तर रूग्णसंख्या आटोक्यात येणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.