ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - विकासाच्या नावाखाली असंवेदनशील मनाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गोदावरीभोवती काँक्रिटचा फास आवळला. केवळ पैशांसाठी नदीचे काँक्रिटीकरण करून जिवंत जलस्त्रोत मृत करून गोदावरीचा श्वास कोंडला असा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केला.गोदावरी प्रगटदिनानिमित्त जलबिरादरी नाशिक, कलावंतांचा जनस्थान ग्रुप आणि गोदाप्रेमींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या गोदावरी संवर्धन चळवळीच्या कार्यक्रमात राजेंद्रसिंह प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सिंहस्थासाठी सातत्याने गोदावरी नदीपात्राभोवती काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काँक्रिटीकरण नदीच्या मुळावर उठले आहे. कोणतीही दूरदृष्टी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने यावेळी दाखविली नाही. यामुळे नदीपात्रातील नैसर्गिक जिवंत जलस्त्रोत, उपनद्यांचा प्रवाह, प्राचीन कुंड बंद झाले आहे. गोदावरीचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी गोदा संवर्धन चळवळीचे रणशिंग राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारकात सर्व तरुण कलावंत व गोदाप्रेमींनी एकत्र येऊन फुंकले. यावेळी अभिनेता सदानंद जोशी, चिन्मय उदगीरकर, कांचन पगारे, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, प्रिया तुळजापूरकर, ऋतुजा बागवे, सुहास भोसले, धनंजय धुमाळ, गोदाप्रेमी देवांग जानी, राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.गोदापूजन...संवर्धन शपथगोदावरीला बारामाही प्रवाहित ठेवण्यासाठी येणारे अडथळे कायमस्वरुपी दूर करू. गोदावरीला स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहू. गोदामाईचा आदर जनमानसातून व्हावा यासाठी समाजप्रबोधनाचा वसा घेऊ, अशी शपथ गोदावरीच्या रामकुंडावर जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत स्थानिक सिने कलावंतांसह सर्व गोदाप्रेमींनी एकत्र येऊन घेतली. यावेळी सिंह यांनी गोदावरीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केले.